चीनसाठी प्रचार युद्धात उतरलेल्या २५०० सोशल मिडिया अकाऊंट्सवर सरकारची नजर

नवी दिल्ली – लडाखमधील भारत-चीन तणावाबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्या व चीनच्या बाजूने प्रचार करणाऱ्या सुमारे अडीच हजार सोशल मीडिया अकाऊंट्सवर सरकार नजर ठेवून आहे. याआधीही अशी खोटी माहिती पसरविणाऱ्या काही सोशल मीडिया अकाऊंट्सवर सरकारने कारवाई केली होती. यातील बहुतांश अकाऊंट्स ही पाकिस्तानातुन हाताळली जात होती.

सरकारने खोटी माहिती पसरवणाऱ्या आणि चिनी प्रचारतंत्र राबवणाऱ्या सोशल अकाऊंट्स वर कारवाई सुरू ठेवली आहे. खोटी माहिती व व्हिडिओ टाकून भ्रम निर्माण केला जात आहे. हे सोशल मीडिया अकाउंटस् पाकिस्तान, हॉंगकॉंग, ब्रिटन, रशिया आणि चीन मधून हाताळली जात असल्याचे लक्षात आले आहे. यातही प्रामुख्याने पाकिस्तानमधून हाताळल्या जाणाऱ्या सोशल मिडिया अकाऊंट्स चे प्रमाण जास्त आहे.

याआधी काही सोशल मीडिया अकाऊंट्सवर सरकारने बंदीची कारवाई केली होती. मात्र यातील काही अकाऊंट्स नाव व इतर माहिती बदलून पुन्हा कार्यरत झाल्याचे लक्षात आले आहे. सोशल मीडिया चालवणाऱ्या कंपन्यांकडे सरकारने हा मुद्दा उपस्थित केला आहे.

या संदर्भात सरकार या कंपन्यांबरोबर संपर्कात असून हे अकाउंटस् ब्लॉक करण्याची कारवाई सुरू आहे. दरम्यान चिनी प्रचारतंत्र राबवणाऱ्या, हेरगिरी व डाटा चोरणाऱ्या २२४ चिनी ॲप्सवर भारताने आतापर्यंत बंदीची कारवाई केली आहे. तसेच नुकताच चीनच्या ‘झिन्हुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ भारतातील प्रभावशाली व्यक्तींची हेरगिरी केली जात असल्याचा अहवाल उघड झाला होता.

leave a reply