परदेशी आक्रमकांचा धोका बळावल्याने उत्तर कोरियाच्या चीनबरोबरील सहकार्याचे महत्त्व वाढले – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन

प्योनग्यँग/बीजिंग – परदेशी आक्रमक शक्तींकडून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरिया व चीनमधील सहकार्य महत्त्वाचे ठरते, असा दावा उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग उन यांनी केला आहे. दोन देशांमधील मैत्री व सहकार्य कराराला सहा दशके पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने चीनला पाठविलेल्या संदेशात किम जाँग उन यांनी हे वक्तव्य केल्याचे कोरियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही दोन देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर नेण्याचे आश्‍वासन दिल्याचा दावा उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने केला आहे.

काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाच्या हुकुमशहांनी अमेरिकेला अणुहल्ल्याची धमकी दिली होती. तसेच संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आदेश आपल्या अधिकार्‍यांना दिले होते. अमेरिकेत बायडेन प्रशासन सत्तेवर आल्यानंतर उत्तर कोरियाने आपल्या लष्करी तसेच आण्विक हालचाली वाढविल्याचेही समोर आले आहे. मार्च महिन्यात उत्तर कोरियाने तीन क्षेपणास्त्र चाचण्याही केल्या होत्या. उत्तर कोरियाच्या आण्विक प्रकल्पात नव्या हालचाली सुरू झाल्याचा अहवालही आंतरराष्ट्रीय अभ्यासगटांनी दिला होता.

या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरिया चीनबरोबरील आपले संबंध अधिक बळकट करण्यावर भर देत असल्याचे किम जाँग उन यांनी जिनपिंग यांना पाठविलेल्या संदेशातून दिसून येते. याआधी मार्च महिन्यात बीजिंगमध्ये दोन देशांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची चर्चा पार पडली होती. यात किम जाँग उन व राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण संदेशांची देवाणघेवाण झाल्याचे सांगण्यात आले होते. दोन्ही देशांमधील पारंपारिक आघाडी अधिक भक्कम निर्णय यावेळी झाल्याची चर्चा होती.

विश्‍लेषकांनी केलेल्या दाव्यांनुसार, चीन व उत्तर कोरियामध्ये चाललेल्या हालचाली म्हणजे चीनच्या डावपेचांचा भाग आहे. कोरोनाची साथ, इंडो-पॅसिफिकमधील कारवाया व मानवाधिकारांचे उल्लंघन या मुद्यांवरून चीनच्या राजवटीची कोंडी होत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी पाश्‍चिमात्यांच्या आघाडीवर दडपण आणण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू आहेत. त्यासाठी चीन उत्तर कोरियाचा वापर करीत असल्याचा विश्‍लेषकांचा दावा आहे.

चीन हा उत्तर कोरियाच्या राजवटीवर सर्वाधिक प्रभाव असलेला देश आहे. सहा दशकांपूर्वी उत्तर कोरियाबरोबर केलेला मैत्री व सहकार्य करार आणि त्याला वारंवार देण्यात आलेली मुदतवाढ, चीनचा उत्तर कोरियावरील हा प्रभाव कायम असल्याचे दाखवून देत आहे. अर्थसहाय्य, अन्नधान्याचा पुरवठा व इतर मदतीच्या माध्यमातून चीनने उत्तर कोरियाच्या राजवटीवरील प्रभाव कायम राखला आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांमागेही चीनचाच हात असल्याचा दावा केला जातो.

leave a reply