अमेरिकेवरील सायबरहल्ल्यांवर कारवाई न केल्यास रशियाला परिणाम भोगावे लागतील – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

वॉशिंग्टन/मॉस्को – अमेरिकेवर झालेल्या रॅन्समवेअर सायबरहल्ल्यांप्रकरणी रशियाने कारवाई करावी, तसे न झाल्यास रशियाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे. बायडेन यांच्या या इशार्‍यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडून प्रतिक्रिया आली. अमेरिकेने अजूनही सायबरहल्ल्यांच्या मुद्यावर माहिती पुरविली नसल्याचे रशियाने आहे. अमेरिकेत गेल्या वर्षभरात एकापाठोपाठ एक मोठे सायबरहल्ले झाले असून त्यामागे रशियन हॅकर्सचा हात असल्याचे मानले जाते.

गेल्या महिन्यात जीनिव्हामध्ये अमेरिका व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट झाली होती. यावेळी रशियाने अमेरिकेच्या 16 संवेदनशील क्षेत्रांमध्ये सायबरहल्ल्याचा प्रयत्न केल्यास त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बजावले होते. या भेटीनंतर काही आठवड्यातच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकी कंपनी ‘कसेया’च्या ‘व्हीएसए’ या सॉफ्टवेअरला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळे अमेरिकेतील शेकडो कंपन्यांना फटका बसल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना सदर हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले होते.

‘कसेया’वर हल्ला करणारा ‘रेव्हिल’ हा गट रशियाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना फोन केल्याचे समोर आले. फोनवर झालेल्या संभाषणात, बायडेन यांनी सायबरहल्ल्यांविरोधातील कारवाईच्या मुद्यावर पुतिन यांना इशारा दिला होता, असे सांगितले जाते. ‘यापुढे रशियन भूमीतून अमेरिकेवर रॅन्समवेअर प्रकारातील सायबरहल्ला झाला तर रशियाला त्याविरोधात कारवाई करावीच लागेल. अमेरिकेने यासंदर्भातील माहिती रशियाला दिलेली आहे. जर कारवाई झाली नाही तर रशियाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असा इशारा बायडेन यांनी दिल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले.

अमेरिकेकडून आलेल्या या वक्तव्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी प्रतिक्रिया दिली. अमेरिकेने सायबरहल्ल्यांबाबत कुठलीही माहिती पुरविली नसल्याचे पुतिन यांनी सांगितले. पण रशिया सायबरहल्ल्यांच्या मुद्यावर अमेरिकेशी सहकार्य करण्यास तयार असून हे सहकार्य नियमित, व्यावसायिक असावे व त्यामागे राजकीय हेतू नसावा, असेही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले. अशा प्रकारच्या सहकार्यासाठी अमेरिका व रशियाच्या यंत्रणांमध्ये ‘स्पेशल डाटा शेअरिंग चॅनल्स’ सुरू व्हायला हवेत, अशी मागणी रशियन राष्ट्राध्यक्षांनी केली.

अमेरिकेत गेल्या वर्षी झालेल्या ‘सोलरविंड्स’ सायबरहल्ल्यांमागे रशियाचा हात असल्याचा आरोप अमेरिकी यंत्रणांकडून करण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी याप्रकरणी रशियाला प्रत्युत्तर देण्यासाठी विशेष योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते. अमेरिकी यंत्रणांकडून रशियावर सायबरहल्ले चढविले जातील असा इशाराही दिला होता. मात्र त्यानंतर अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील हल्ले झाले असून कोट्यावधी डॉलर्सची खंडणीही मागण्यात आल्याचे समोर आले. या हल्ल्यांमागे रशियन हॅकर्सचा हात असल्याची खात्री पटल्याचे दावे करून अमेरिकेने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याचे बायडेन यांच्या वक्तव्यांवरून दिसत आहे.

leave a reply