मुसळधार पावसाचा मुंबईसह कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा

मुंबई – सोमवारी मध्यरात्रीपासून केवळ १० तासात पडलेल्या २३० एमएम पावसाने मुंबईकरांना २६ जुलैची आठवण करून दिली. वादळी वारा आणि धुवाँधार पावसाने मुंबई रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प केली. मंगळवारी पहाटे कांदिवली येथे भूस्खलन होऊन येथील टेकडीचा मोठा भाग महामार्गवर आला. तर वाकोला येथे घराचा भाग कोसळल्याने दोन जणांचा बळी गेला. मुंबईसह कोकणात, तसेच कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये जोरदार पाऊस झाला.

Mumbai-Konkan-Rainsमुंबई, ठाण्यासह आसपासच्या परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन असलेल्या मुंबईला आणखी लॉकडाऊन केले. जोरदार वाऱ्याच्या तडाख्याने कित्येक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाले होते. याचबरोबर मालाड, कांदिवली येथील अनेक भागात पाणी साचले होते. कांदिवली पूर्वेला समता नगरजवळील डोंगरावरून मातीचा ढिगारा पश्चिम द्रुतगती महामार्गावर आल्याने मीरारोडवरून मुंबईला येणारी वाहतूक ठप्प झाली.

रस्ते वाहतुकीसह लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे ते चर्चगेट दरम्यान लोकल सेवा ठप्प पडली होती. तर मध्य रेल्वे मार्गावर लोकल वाहतूक मंदगतीने सुरु होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान हार्बर मार्गावरील वाहतूक बंद होती. सध्या कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन असल्याने केवळ आपत्कालीन सेवा बजावणाऱ्यांसाठी रेल्वे वाहतूक सुरु आहे. मात्र रेल्वे ठप्प पडल्याने आणि पावसाचे भयकंर रूप पाहता सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या.

Mumbai-Konkan-Rainsकोकणातही मुसळधार पावसाने कित्येक नद्यांची पातळी वाढली. खेडमधील गजबुडी, संगमेश्वर येथील शास्त्री नदीला, रत्नागिरीत काजळी नदीला पूर आला. रायगडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. दरम्यान, मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याने ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

leave a reply