इराण, सिरिया, लेबेनॉनमधील पीआयजेच्या कमांडरना जबर किंमत चुकवावी लागेल

-इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ

israel-gantzजेरूसलेम – इराण, सिरिया, लेबेनॉनमधील हॉटेलमध्ये बसून इस्रायलविरोधात कारवाया करणाऱ्या पीआयजेच्या कमांडरना याची जबर किंमत चुकवावी लागेल, असा सज्जड इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. काही तासांपूर्वी पीआयजेचा प्रमुख झियाद अल-नखला याने इराणचा दौरा केला होता. झियादच्या या दौऱ्याला उद्देशून गांत्झ यांनी इशारा दिल्याचे दिसत आहे.

गाझापट्टीतून होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांविरोधात यशस्वी ठरलेल्या ‘आयर्न डोम’ची पाहणी करण्यासाठी इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी शनिवारी दक्षिणेकडचा दौरा केला. यावेळी संरक्षणमंत्री गांत्झ यांनी पीआयजेचे नेते व कमांडर पॅलेस्टिनींचे नुकसान करीत असल्याचा ठपका ठेवला. इराण, सिरिया आणि लेबेनॉनमधील हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये राहणारे पीआयजेचे नेते पॅलेस्टिनी जनतेपासून विभक्त झाले आहेत, असा दावा गांत्झ यांनी केला. इस्रायलमध्ये हल्ले चढविण्याचे कितीतरी कट यशस्वीरित्या उधळण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, पीआयजेचे प्रमुख झियाद यांनी इराणचा दौरा करून इस्रायलविरोधात कारवाईसाठी सहाय्याची मागणी केली आहे. लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेने पीआयजेच्या इस्रायलवरील हल्ल्यांचे स्वागत केले आहे. यावेळी पीआयजेच्या लेबेनॉनमधील नेत्यांनी हिजबुल्लाहशी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

leave a reply