अमेरिकेच्या ‘सिडीसी’कडून कोरोनासंबंधी नवा इशारा

बाल्टिमोर – कोरोनाव्हायरसमुळे अमेरिकेत दगावलेल्यांची संख्या ९२ हजारांच्याही पलिकडे गेली असून या देशात साडेपंधरा लाखाहून अधिक जणांना या साथीची लागण झाली आहे. त्यातच अमेरिकेतील मुलांमध्ये या साथीची विचित्र लक्षणे दिसून असल्याची चिंताजनक माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिसीज् कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सिडीसी) या विभागाने अलर्ट जारी केला आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील मुलांमध्येही अशाच प्रकारची लक्षणे आढळली होती.

जगभरात कोरोनाने ३,२०,७९० जणांचा बळी घेतला आहे. गेल्या चोवीस तासात या साथीने दगावलेल्या ३,४०४ रुग्णांचा यात समावेश असल्याची माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली. याबरोबरच जगभरात गेल्या चोवीस तासात नव्वद हजाराहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून जगभरातील या रुग्णांची एकूण संख्या ४९,२३,९९७ वर पोचली आहे. यापैकी १९ लाख जण उपचारांती बरे झाले आहेत. सोमवारी अमेरिकेत या साथिने ७५९ जणांचा बळी गेला असून या देशातील कोरोनाच्या बळींची एकूण संख्या ९८,९८१ वर गेली आहे. तर अमेरिकेत सोमवारी ४२ हजाराहून अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.

अमेरिकेतील रुग्ण व बळींच्या संख्येचा आलेख खाली येत असताना, ‘सिडीसी’ने एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेतील मुलांमध्ये कोरोनाव्हायरस संबंधी नवी लक्षणे सापडली असून ही फार चिंताजनक बाब असल्याचे सीडीसीने म्हटले आहे. ‘मल्टीसिस्टम इन्फ्लामेट्री सिंड्रोम इन चिल्ड्रेन’ अर्थात ‘एमआयएस-सी’ हा कोरोनाशी संबंधित आजार मुलांमध्ये आढळल्याचे ‘सीडीसी’ने आपल्या नव्या अलर्टमध्ये बजावले आहे. ताप, पोटदुखी, डायरिया, आणि त्वचेचा रंग बदलणे अशी या आजाराची काही प्रमुख लक्षणे आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात या साथीचे ६४ मुले आढळली आहेत. याआधी ब्रिटनमधील मुलांमध्ये या आजाराची लक्षणे आढळली होती. तर फ्रान्समध्ये कोरोनासंबंधी या आजाराने काही मुले दगावली होती. या पार्श्वभूमीवर सिडीसी’ने अमेरिकेत कोरोनासंबंधी या आजाराबाबत इशारा दिला आहे.

कोरोनाव्हायरससंबंधी जगभरातील घडामोडीत रशियामध्ये मंगळवारी या साथीचे ९,९६३ नवे रुग्ण आढळले आहेत. याबरोबर रशियातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २,९९,९४१ वर पोहोचली आहे. अमेरिकेनंतर रशियामध्ये या साथीचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तर ब्राझिलमध्ये गेल्या चोवीस तासात ८२३ जणांचा बळी गेला आहे. तर ब्राझिलमध्ये या साथीचे चोवीस तासात सोळा हजाराहून अधिक रुग्ण सापडले असून या देशातील कोरोनाबाधितांची संख्या २,५७,३९६ वर पोहोचली आहे. ब्राझिलमधील ॲमेझॉनच्या जंगलातील स्थानिक आदिवासिंनाही या साथीची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी या साथीने अॅमेझॉनच्या जंगलात २३ जणांचा बळी घेतला असून आतापर्यंत या भागातील १०३ स्थानिक या साथीने दगावल्याचा दावा केला जातो. ॲमेझॉनच्या जंगलात या साथीचा फैलाव वाढू नये यासाठी येथील आदिवासींना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे.

leave a reply