हिजबुलचा प्रमुख सलाउद्दीन याची भारताला धमकी

श्रीनगर – हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर रियाज नायकूला भारतीय सुरक्षादलाने ठार केल्यानंतर, हिजबुलचा प्रमुख असलेल्या सय्यद सलाउद्दीन याने भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादमध्ये आयोजित केलेल्या नायकूच्या शोकसभेत, काश्मीरच्या मुद्यावरून पडलेल्या ठिणगीमुळे या सार्‍या क्षेत्रात संर्घषाचा भडका उडेल असे सलाउद्दीन याने धमकावले आहे.

भारतीय सुरक्षा दलांना रियाज नायकू याला संपविण्यात यश मिळाल्यानंतर त्याचे हादरे पाकिस्तानपर्यंत जाणवू लागले आहेत. पाकिस्तानची माध्यमे नायकू याने काश्मीरसाठी बलिदान दिले असा दावा करून त्याच्यावर स्तुतीसुमने उधळत आहेत . तर भारताचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी नायकू सारखे दहशतवादी म्हणजे रॅम्बो नाहीत. त्यांना अवास्तव महत्त्व देऊ नका, असे माध्यमांना सुचविले आहे. तर काश्मीरमधील आपला महत्त्वाचा कमांडर गमावलेल्या हिजबुल मुजाहिदीनने यासाठी भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला. नायकू याचे बलिदान वाया जाणार नाही असा दावा हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दिन याने केला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबाद येथे नायकू याच्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेत सलाउद्दीन बोलत होता. काश्मीरमुळे उडालेल्या संघर्षाच्या ठिणगीमुळे या क्षेत्रात संघर्षाचा भडका उडेल, असा दावा सलाउद्दीन यांने केला आहे.

भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये सुरू केलेल्या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांचे मनोधैर्य खचले असून अलीकडच्या काळात दहशतवादी संघटनांना कमांडर मिळेनासे झाले आहेत. नव्या दहशतवाद्यांची भरती देखील बऱ्याच प्रमाणात थंडावली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा दलांनी ठार केलेल्या नायकू याच्यासारख्या दहशतवादाचे उदात्तीकरण करणे सलाउद्दीन व इतर दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना भाग पडत आहे. पण प्रत्यक्षात या दहशतवादी संघटनांकडे आता पूर्वीसारखी ताकद उरलेली नाही. ही बाब वेळोवेळी उघड झाली होती. सय्यद सलाउद्दीन व पाकिस्तान कडून आपल्या दहशतवादी कारवायांना पहिल्यासारखे सहाय्य मिळत नाही यावर रियाज नायकू नाराजी व्यक्त करीत होता. म्हणूनच त्याचे सय्यद सलाउद्दीन याच्याशी तीव्र मतभेद ही झाले होते.

तर पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआय, पाकिस्तानचे लष्कर आंतरराष्ट्रीय दडपण आणि ‘एफएटीएफ’च्या कारवाईच्या भीतीने उघडपणे दहशतवादी संघटनांना सहाय्य करू शकत नसल्याची बाबही समोर आली होती. यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना अधिक दुबळ्या बनल्या आहेत. त्यातच भारतीय सुरक्षा दलाने सुरू केलेल्या आक्रमक कारवाईचे परिणाम दिसू लागले असून या वर्षात जम्मू काश्मीर मध्ये ६४ दहशतवादी ठार झाले असून २५ जणांना जिवंत पकडण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. अशा परिस्थितीत हिजबुलच्या प्रमुखाने दिलेल्या धमकीचा भारतावर विशेष परिणाम होण्याची अजिबात शक्यता नाही.

leave a reply