हिजबुलचा मोस्ट वॉन्टेड कमांडर रियाझ नायकू ठार

 श्रीनगर – भारतीय लष्कराचे जवान व  जम्मू-काश्मीरच्या पोलीसदलावरील हल्ले, त्यांचे अपहरण व हत्या यासारख्या भयंकर कारवायांचा सूत्रधार असलेला ‘हिजबुल मुजाहिदीन’चा कमांडर रियाज नायकू चकमकीत ठार झाला. भारतीय सुरक्षा दलांना मिळालेले हे फार मोठे यश मानले जाते व दहशतवादी संघटनांसाठी हा फार मोठा हादरा  ठरत असल्याचा दावा केला जातो.

काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसात चार मोठ्या चकमकी झाल्या आहेत. हंदवारातच झालेल्या दोन चकमकीत लष्कराच्या कर्नल आणि मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांसह आठ जवान शाहिद झाले होते. त्यानंतर सुरक्षादलांनी काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहीम अधिकच तीव्र केली आहे. यामध्ये पुलवामातील अवंतिपुरामध्ये एका घरात ‘हिजबुल’ कमांडर नायकू आल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर मंगळवारी रात्री ११ वाजता या भागात शोध मोहीम हाती घेण्यात आली, तर मध्यरात्री चकमक सुरु झाली.

या आधी अशाच चकमकींमध्ये नायकू दोन वेळा पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. मात्र यावेळेला त्याला पळून जाण्याची कोणतीही संधीच देण्यात आली नाही आणि नायकू त्याचा साथीदारासह चकमकीत ठार झाला. नायकू चकमकीत मारला जाणे  ‘हिजबुल’साठी आणि इतर काश्मीरमधील दहशतवादी गटासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. २०१६ साली ‘हिजबुल’चा काश्मीरमधील कमांडर बुऱ्हान वाणी ठार झाल्यानंतर जागी झाकीर मुसा याला नेमण्यात आले होते. मात्र झाकीर मुसाने २०१७ साली  ‘हिजबुल’ सोडली आणि त्याने अलकायदाशी संधान साधून ‘अन्सार गजवात उल हिंद’ नावाची वेगळी संघटना स्थापन केली. त्यानंतर नायकू ‘हिजबुल’चा काश्मीरमधील कमांडर बनला.

गेली काही महिने सुरक्षादलांकडून नायकूचा शोध सुरु होता. गेल्या तीन वर्षांत लष्कराच्या ऑपरेशनमध्ये ‘हिजबुल’चे काश्मीरमधील अस्तित्व  जवजवळ संपत आले असले, तरी या संघटनेचा काश्मीरमधील मुख्य कमांडर रियाझ नायकू मात्र फरार होता आणि दहशतवादी कारवाया करीत होता. लष्कर आणि पोलीस जवानांचे अपहरण करून क्रूर हत्या करण्याचे सत्र नायकूने सुरु केले, तसेच ग्रेनेड हल्ले करून पळून जाणाचे नवे दहशती तंत्र त्याने तयार केले होते. तसेच ध्वनिफीत जारी करून धमक्या देत दहशत माजविण्याचे कार्यपद्धती त्याने स्विकारली. तसेच दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांना भरती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कारण्यामागेही नायकूचा हात असल्याचे बोलले जाते. २०१८ सालच्या ऑगस्ट महिन्यात एका दहशतवादी हल्ल्यात सुरक्षादलाचे चार जवान शाहिद झाले होते. यानंतर नायकूच्या वडिलांसह १९ जणांना काश्मीर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र नायकूने त्यांना सोडवण्यासाठी दोन दिवसात पोलिसांच्या ११ कुटुंबियांचे अपहरण केले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १९ जणांना सॊडल्यावर नायकुने पोलिसांच्या या ११ कुटुंबीयांची सुटका केली होती. तेव्हापासून सुरक्षादल नायकूचा माग काढत होते.

गेल्या काही महिन्यांपासून ‘लश्कर-ए-तोयबा’च्या द रजिस्टेंस फ्रंट (टीआरएफ) आणि हिजबुलमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु होती. हिजबुलचा एक कमांडर ‘टीआरएफ’ला जाऊन मिळाला होता. त्यामुळे नायकू नाराज होता.  तसेच काश्मीरचा विशेष दर्जा भारताने काढून घेतल्यावर  हिजबुल प्रमुख सय्यद  सल्लाउद्दीनने आक्रमक भूमिका घेतली नाही म्हणून त्याच्यावर टीका केली होती. तसेच सीमेपलीकडून कोणतेही सहाय्य मिळत नसल्यानेही नायकू सल्लाउद्दीनवर नाराज होता.  बुऱ्हान वाणीनंतर हिजबुलाचा पोस्टर बॉय बनलेला हा दहशतवादी मारला गेल्याने सुरक्षादलांना मिळालेले फार मोठे यश ठरते.

दरम्यान बुधवारी दुसऱ्या एका चकमकीत आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आहे. तसेच मंगळवारी रात्री उशिरा  जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला सुरक्षादलांनी शस्त्रासाठ्यासह अटक केली. त्याआधी दहशतवाद्याचा एक तळही सुरक्षादलांनी नष्ट करून मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. गेल्या महिन्यात काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी २८ दहशतवाद्यांना निरनिराळ्या चकमकीत ठार केले आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यावर पहिल्यादांच एका महिन्यात इतके दहशतवादी मारले गेले होते. काश्मीरमध्ये बर्फ वितळत असताना घुसखोरीच्या प्रयत्नात वाढ झाली असून त्यामुळे सुरक्षादलांनी दक्षिण आणि उत्तर  काश्मीरच्या सीमा भागात दहशतवादविरोधी मोहीम अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

leave a reply