जगभरात चोवीस तासात कोरोनाचे सहा हजाराहून अधिक बळी

लंडन – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे जगभरात सहा हजाराहून अधिक जणांचा बळी गेला असून या साथीने दगावलेल्यांची एकूण संख्या २,५८,९६२ वर गेली आहे. मंगळवारी अमेरिका आणि ब्रिटनमधील कोरोनाच्या बळींच्या संख्येत वाढ झाल्याची नोंद जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने केली आहे. त्याचबरोबर जगभरात या साथीच्या नव्या रुग्णांच्या संख्येत ८० हजारांनी भर पडली असून जगातील या साथीच्या रुग्णांची संख्या ३७,४७,३१३ वर पोहोचली आहे. तर जगभरात या साथीवर मात करुन घरी परतलेल्यांची संख्याही साडे बारा लाखांहून अधिक आहे.

गेल्या तीन दिवसांपासून अमेरिकेतील या साथीच्या बळींच्या संख्येत घट झाल्याचे दिसत होते. पण जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात अमेरिकेत या साथीने २,३३३ जणांचा बळी घेतला, तर या देशात ५६ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिकेत या साथीने एकूण ७१,०२२ जण दगावले असून १२,३८,०५२ जणांना या साथीची लागण झाली आहे. या साथीने अमेरिकेत किमान एक लाख जणांचा मृत्यू होईल, अशी भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.

या साथीने युरोपमध्ये आत्तापर्यंत १,४४,००० हून अधिक जणांचा बळी गेला असून यात ब्रिटनमधील २९,६८४ जणांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये या साथीने ४५६ जणांचा बळी घेतला. तर या साथीने इटलीत २९,३१५ आणि स्पेनमध्ये २५,६१३ तर फ्रान्समध्ये २५,५३१ जणांचे बळी घेतले आहेत. जर्मनीमध्ये या साथीने ६,९९३ जणांचा मृत्यू झाला असून १,६७,००० हून अधिक रुग्ण या देशात आहेत.

अमेरिका, युरोपनंतर या साथीचे सर्वाधिक बळी आशियामध्ये गेल्याचे जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने म्हटले आहे. आशियातील या साथीच्या बळींची संख्या २० हजाराच्या पुढे गेली असून या साथीच्या रुग्णांची संख्या सहा लाखांजवळ पोहोचली आहे. तर लॅटीन अमेरिकेत या साथीने १५ हजाराहून अधिक जण दगावले असून ब्राझिलमध्ये सर्वाधिक ७,९५८ तर इक्वेडोरमध्ये १,५६९ जणांचा बळी गेला आहे. लॅटीन अमेरिकेतील या साथीच्या रुग्णांची संख्याही तीन लाखांजवळ पोहोचली असून एकट्या ब्राझीलमध्ये १,१५,९५३ रुग्ण आहेत.

गेल्या चोवीस तासात रशियामध्ये या साथीमुळे ८६ जणांचे बळी गेले असून रशियात १,५३७ जण या साथीने दगावले आहेत. तर सलग चौथ्या दिवशी रशियात दहा हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. बुधवारी रशियन यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात या साथीच्या १०,५५९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून रशियात कोरोनाचे १,६५,९२९ रुग्ण आहेत.

leave a reply