देशात दररोज दोन लाख पीपीई किट्सची निर्मिती सुरु

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच असलेल्या ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह एक्विपमेंट’ (पीपीई) किट्सची आता देशात युध्दपातळीवर निर्मिती होत आहे. दरदिवशी देशात जवळपास दोन लाख पीपीई किट्स तयार होत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. याआधी भारतात पीपीई किट्स तयार होत नव्हते. पण कोरोनाव्हायरसची साथ आल्यानंतर डीआरडीओसह भारतातल्या इतर कंपन्यानी जलदगतीने पीपीई किट्सची निर्मिती सुरु केली.

देशात कोरोनाव्हायरस फैलावत गेल्यानंतर सरकारने इतर देशांमधून पीपीई किट्सची आयात केली. पण रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पीपीई किट्सचा तुटवडा जाणवत होता. त्यानंतर देशातल्या ५२ खाजगी कंपन्यांनी पीपीई किट्सची निर्मिती सुरु केली. यात डीआरडीओ आणि ‘ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड’ युद्धपातळीवर हे काम करीत आहे. सध्या दिवसाला देशात दोन लाख पीपीई किट्स तयार होत आहे. तर दोन मे रोजी ही संख्या दोन लाखांच्याही पुढे गेली होती. हा दोन महिन्यातला विक्रम ठरतो. आतापर्यंत सरकारने २१ लाख पीपीई किट्स केंद्रातील आणि राज्यातील हॉस्पिटल्सना उपलब्ध करुन दिली आहेत. तसेच सरकारने १५ लाख किट्स राखीव ठेवल्याचे सांगितले जाते.

जून महिन्यापर्यंत भारतातील डॉक्टर्स आणि नर्सेसना दोन कोटीहून अधिक पीपीई किट्सची आवश्यकता भासणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या कंपन्यांनी आपली क्षमता वाढविण्यास सुरुवात केली आहे. तसेच केंद्र सरकार इतर देशांमधून ८० लाख पीपीई किट्स आयात करणार आहे. मध्यंतरी सरकारने चीनमधून पीपीई किट्स आयात केली होती. पण ही किट्स सदोष आढळल्यानंतर भारताने ही ऑर्डर रद्द करुन टाकली होती. दरम्यान, कोरोनाव्हायरसच्या साथीच्या आधी भारतात पीपीई किट्सचे निर्मितीचे प्रमाण शून्यावर होते. पण आता दिवसाला दोन लाख किट्स तयार होत असल्याचे सांगून आरोग्य मंत्रालयाने त्यावर समाधान व्यक्त केले. पुढच्या काळात कोरोनाव्हायरसच्या युद्धात ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

leave a reply