चिथावणीखोर कारवायांद्वारे तुर्की ग्रीसच्या संयमाची कसोटी पाहत आहे

- ग्रीसचा तुर्कीला इशारा

अथेन्स – ‘ग्रीसच्या ताब्यातील बेटांवरील सैन्याची तैनाती मागे घेण्याची मागणी करून ग्रीसच्या हवाई हद्दीत विमानांची घुसखोरी घडविणाऱ्या तुर्कीच्या कारवाया ग्रीसच्या संयमाची कसोटी पाहत आहेत’, असा इशारा ग्रीसचे संरक्षणमंत्री निकोस पॅनागिओतोपुलस यांनी दिला. ग्रीसने शिओस आणि सामोस या बेटांवरील आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी काही तासांपूर्वी केली होती. त्याने संतापलेल्या ग्रीसने यावरून तुर्कीला खडसावल्याचे दिसत आहे.

साऱ्या जगाचे लक्ष रशिया-युक्रेन युद्धाकडे केंद्रीत झाले आहे. याचा फायदा घेऊन तुर्कीने आपल्या क्षेत्रातील हालचाली तीव्र केल्या आहेत. ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोसा मित्सोटाकिसा यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला होता. ग्रीसच्या पंतप्रधानांनी या दौऱ्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेऊन एफ-35 या अतिप्रगत लढाऊ विमानांच्या खरेदीसंबंधी करार केला. तसेच पंतप्रधान मित्सोटाकिसा यांनी अमेरिकन काँग्रेसमधील भाषणात तुर्कीवर ताशेरे ओढले होते.

यामुळे संतापलेल्या तुर्कीने ग्रीसच्या हवाईहद्दीत घुसखोरी सुरू केली. याआधीही तुर्कीच्या लढाऊ विमानांनी ग्रीसच्या हवाईहद्दीचे उल्लंघन केल्याची उदाहरणे आहेत. पण पंतप्रधान मित्सोटाकिसा यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर तुर्कीच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर तुर्कीच्या गस्तीनौकांनी ग्रीसच्या एजिअन सागरी क्षेत्रातही घुसखोरी केली होती. तसेच तुर्कीतून ग्रीसच्या सीमेवर धडकणाऱ्या निर्वासितांची संख्याही वाढत चालली आहे.

हे सारे सुरू असतानाच, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी पंतप्रधान मित्सोटाकिसाकडे नवी मागणी केली. ग्रीसने शिओस आणि सामोस या बेटांवर तैनात केलेले आपले सैन्य माघारी घ्यावे, या बेटांचे लष्करीकरण करू नये, असा प्रस्ताव तुर्कीने दिला. या बेटांवरील सैन्यतैनाती तुर्कीच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याचा आरोप तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांनी केला. तसेच ग्रीसच्या ताब्यात असलेल्या 14 बेटांवर तुर्कीने दावा सांगितला आहे.

यामुळे खवळलेल्या ग्रीसचे संरक्षणमंत्री निकोस पॅनागिओतोपुलस यांनी तुर्कीला खडसावले. ‘ग्रीस आपल्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी कुठलीही कारवाई करू शकतो. चिथावणीखोर कारवाया करून तुर्की ग्रीसच्या संयमाची कसोटी पाहत आहे’, असे संरक्षणमंत्री पॅनागिओतोपुलस यांनी स्लोव्हाकिया येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबसेक’च्या बैठकीत बजावले.

तसेच नाटोचा सदस्य देश असलेल्या तुर्की नाटोच्या दुसऱ्या सदस्य देशाला धमकावत असल्याची विचित्र परिस्थिती यामुळे पहायला मिळत असल्याची टीका ग्रीसच्या संरक्षणमंत्र्यांनी केली. असे सहकारी देश असण्यापेक्षा ग्रीस स्वसंरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय अधिकारांचा वापर करील, असे संरक्षणमंत्री पॅनागिओतोपुलस यांनी ठणकावले.

दरम्यान, तुर्कीच्या हवाई घुसखोरीनंतर ग्रीसने आपल्या संरक्षणदलांना हाय अलर्टवर ठेवले आहे. युरोपात दाखल होण्यासाठी आफ्रिकी आणि आशियाई देशांमधील निर्वासितांचे लोंढे तुर्कीत दाखल झाले आहेत. हे लोंढे ग्रीसमार्गे युरोपात सोडू, असा इशारा तुर्कीने याआधी दिला होता. आता ग्रीसबरोबरील संबंध विकोपाला गेलेले असताना, तुर्की आपल्या देशातील या निर्वासितांचा वापर ग्रीसच्या विरोधात करू शकेल. हे लक्षात घेऊन ग्रीसच्या सरकारने आपल्या यंत्रणांना निर्वासितांच्या लोंढ्यांना तोंड देण्यासाठी सज्ज रहा, अशी सूचना केलेली आहे.

leave a reply