रशियाने सिरियन राजवट उलथण्याची तयारी केल्याने हिजबुल्लाहची तारांबळ

- रशियन वर्तमानपत्राचा दावा

मॉस्को – गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ सिरियातील संघर्षात गुंतलेला रशिया माघार घेण्याच्या तयारीत आहे. त्याआधी रशिया अस्साद यांची राजवट उलथून सिरियातील सत्तेची जबाबदारी लष्करी आघाडीकडे सोपवू शकतो. यामध्ये सिरियातील विरोधी गटांचाही समावेश असेल, अशी चिंता हिजबुल्लाहला सतावू लागली आहे. यासाठीच हिजबुल्लाहच्या वरिष्ठ शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी रशियाचा तातडीचा दौरा केला. रशियातील ‘नेझाविसिमाया गॅझेटा’ या वर्तमानपत्राने हा दावा केला आहे.

दोन दिवसांपूर्वी लेबेनॉनमधील इराणसंलग्न हिजबुल्लाह या गटाचे नेते मोहम्मद राद यांनी रशियाला भेट दिली. या भेटीत राद यांनी रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याशी चर्चा केली. रशियन मुखपत्राने लॅव्हरोव्ह आणि राद यांच्या भेटीची माहिती दिली. पण रशियातील एका वर्तमानपत्राने या भेटीबाबत वेगळीच माहिती प्रसिद्ध केली.
इराणच्या लष्कराची तसेच इराणसंलग्न गटांची सिरियातील तैनातीवर रशियाला मान्य नाही. त्यामुळे सिरियातील इराणचा प्रभाव आणि तैनाती कमी करण्यासाठी रशियाकडून सिरियामध्ये ‘मिलिटरी काऊन्सिल’ प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. असे झाले तर रशिया अस्साद यांना सत्तेतून बाजूला सारून सिरियामध्ये रशियासमर्थक आघाडी सरकार स्थापन करील. यामुळे इराणचा सिरियावरील प्रभाव कमी होऊ शकेल.

काही दिवसांपूर्वी सिरियातील अस्सादविरोधी गटातील नेते मुनाफ लास यांनी रशियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली होती. लास हे तुर्कीसंलग्न गटाचे नेते मानले जातात. त्यामुळे सिरियावरील इराणचा प्रभाव कमी करण्यासाठी रशिया अस्साद यांची राजवट उलथण्यावर विचार करीत असल्याचा दावा रशियन वर्तमानपत्राने केला. यामुळे इराणसंलग्न अस्वस्थ झालेल्या हिजबुल्लाहने आपल्या वरिष्ठ नेत्यांना रशियाला रवाना केल्याचे सदर वर्तमानपत्राचे म्हणणे आहे.

रशियन सरकार किंवा हिजबुल्लाहने सदर वर्तमानपत्रातील बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सिरियातील इराण तसेच हिजबुल्लाहच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत रशिया नाराज असल्याच्या बातम्या याआधीही प्रसिद्ध झाल्या होत्या. इस्रायलने देखील रशियाकडे याबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी हिजबुल्लाहच्या नेत्यांबरोबरच्या चर्चेत इस्रायलने रशियाला दिलेला संदेश पोहोचविल्याचा दावाही केला जातो. येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदीवर हल्ले चढवून केलेल्या चुकीची पुनरावृत्ती हिजबुल्लाहने इस्रायलबाबत करू नये. कारण तसे केल्यास इस्रायल हिजबुल्लाहची गय करणार नाही व यामध्ये लेबेनॉनही पोळले जाईल, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी दिला होता. हा इस्रायलचा खरमरीत संदेश रशियाने हिजबुल्लाहला दिल्याची माहिती पाश्‍चिमात्य देशांच्या राजनैतिक सूत्रांकडून मिळाल्याचे बोलले जाते.

leave a reply