विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशी

नवी दिल्ली – २००८ साली अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून ५६ जणांचा बळी घेणार्‍या ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या ३८ जणांना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा ऐतिहासिक निकाल देताना विशेष न्यायालयाने या कटात सहभागी असलेल्या ११ जणांना आजन्म तुरुंगवास ठोठावला आहे. निष्पाप नागरिकांचा बळी घेणार्‍या दहशतवाद्यांना विशेष न्यायालयाने सुनावलेल्या या कठोर शिक्षेचे देशभरात स्वागत होत आहे. या बॉम्बस्फोट मालिकेतील ५६ बळी व जखमी झालेल्या दोनशेहून अधिकजणांना न्याय मिळाला आहे, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया नोंदविली जात आहे.

२६ जुलै २००८ रोजी ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेने गुजरातच्या अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडविले होते. ७० मिनिटांच्या कालावधित २१ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून या दहशतवादी संघटनेने गदारोळ माजविला. या घातपाताद्वारे भारतात अस्थैर्य व अराजक माजविण्याचे भयंकर कारस्थान इंडियन मुजाहिद्दीनने आखले होते. पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ने या घातपातासाठी सहाय्य पुरविल्याचेही स्पष्ट झाले होते.

भारतात झालेल्या घातपातामागे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना असतात, हे जगजाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने आपल्यावर होणारे आरोप टाळण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन नावाची दहशतवादी संघटना स्थापन केली. या दहशतवादी संघटनेने केलेल्या घातपाताशी आपला संबंध नाही, हे दाखविण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयने ही सावधगिरी बाळगली होती. तरीही अहमदाबादमधील या बॉम्बस्फोट मालिकेतील आयएसआयचा सहभाग उघड झाला होता.

अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणणार्‍या ३८ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावून विशेष न्यायालयाने कठोर संदेश दिलेला आहे, असा दावा माध्यमे करीत आहेत. भारत दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाही, हा इशारा यातून सर्वांना मिळाल्याचे दावे केले जातात. दरम्यान, या अपराधासाठी शिक्षा झालेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याने त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा कट आपण आखला होता, अशी कबुली दिल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे.

leave a reply