युक्रेनच्या मुद्यावर भारताने स्वीकारलेल्या स्वतंत्र भूमिकेचे रशियाकडून स्वागत

संयुक्त राष्ट्रसंघ – संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेने युक्रेनचा मुद्दा उपस्थित करून यावरून रशियाला धमकावले. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला, तर त्याचे भयंकर परिणाम होतील, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला. इथे उपस्थित असलेल्या रशियन राजदूतांनी त्याला तिथल्या तिथेच सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र युक्रेनच्या प्रश्‍नावर निर्माण झालेला तणाव तातडीने कमी करावा, असे आवाहन भारताने केले. राजनैतिक वाटाघाटीखेरीज दुसर्‍या मार्गाने ही समस्या सोडविता येणार नाही, याची जाणीव भारताने करून दिली आहे. रशियाने भारताच्या या भूमिकेचे स्वागत केले.

रशियाने युक्रेनवर हल्ला चढविलाच, तर भारताने रशियाला नाही, तर अमेरिकेला साथ द्यावी, अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली होती. भारताला जर नियमांवर आधारित जागतिक व्यवस्था हवी असल्यास भारताला अशीच भूमिका स्वीकारणे भाग आहे, अशा स्वरुपाचा दबाव अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने टाकला होता. मात्र भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्र असल्याची जाणीव अमेरिकेला पुन्हा एकदा करून दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य असलेल्या भारताने युक्रेनच्या प्रश्‍नावर निर्माण झालेला तणाव त्वरित कमी करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली.

याच्या बरोबरीने भारताने राजनैतिक वाटाघाटींखेरीज ही समस्या सोडविण्यासाठी दुसरा पर्यायच नसल्याचे ठासून सांगितले. वेगळ्या शब्दात संघर्षाने युक्रेनची समस्या सुटणार नाही, याची परखड जाणीव करून दिलेली आहे. या समस्येशी निगडीत असलेल्या सर्वच देशांच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांचा विचार करून हे क्षेत्र व त्या पलिकडच्याही भागात दिर्घकाळासाठी शांतता नांदेल, अशारितीने इथला तणाव कमी करायला हवा, असे भारताने म्हटले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये मिन्स्क करार झालेला आहे. या कराराचे पालन व्हावे, असा आग्रह भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत टी. एस. तिरूमुर्ती यांनी धरला.

युक्रेनमध्ये सुमारे २० हजार भारतीय असून यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची बहुसंख्या आहे. त्यांची सुरक्षा ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता ठरते, असे राजदूत थिरूमुर्ती यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिका दबाव टाकत असताना देखील भारताने रशियाच्या विरोधात जाण्याचे नाकारून युक्रेनच्या मुद्यावर तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. याचे रशियाने स्वागत केले. भारताची यासंदर्भातील भूमिका संतुलित, सैद्धांतिक आणि स्वतंत्र आहे, याचे आम्ही स्वागत करतो, असे भारतातील रशियाच्या राजदूतांनी म्हटले आहे.

leave a reply