मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या कोरोना साथीचा गैरफायदा घेत आहेत

- इंटरपोलचा इशारा

मानवी तस्करीलिऑन – निर्वासितांची घुसखोरी व मानवी तस्करीत सहभागी असणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या कोरोनाच्या साथीचा गैरफायदा उचलत आहेत, असा इशारा इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संघटनेने दिला. काही दिवसांपूर्वीच इंटरपोलने एक व्यापक मोहीम राबवून मानवी तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या 200हून अधिक गुन्हेगारांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर इंटरपोलच्या प्रमुखांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असे गुन्हे वाढत असल्याचे बजावले.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर ‘इंटरपोल’ने ‘ऑपरेशन टर्केसा 2’ नावाने जागतिक मोहीम हाती घेतली होती. अमेरिका व युरोपसह जगातील 32 देशांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. मोहीमेदरम्यान विविध देशांमध्ये बेकायदेशीररित्या घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तसेच केलेल्या सुमारे साडेतीन हजार निर्वासितांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी निर्वासितांना इतर देशांमध्ये अवैधरित्या घुसण्यासाठी मदत करणाऱ्या तसेच मानवी तस्करीत सहभागी असलेल्या टोळ्यांमधील 200हून अधिक जणांना अटक करण्यात आली. यात ‘रेड कॉर्नर नोटीस’ बजावलेल्या गुन्हेगारांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

मानवी तस्करी

या मोहिमेची माहिती देताना इंटरपोलचे प्रमुख जुर्गन स्टॉक यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्वासितांची घुसखोरी व मानवी तस्करीचा धोका अधिकच वाढल्याचा इशारा दिला. कोरोनाच्या साथीत अडचणीत आलेले अनेक जण रोजगार व इतर कारणांसाठी दुसऱ्या देशात जाण्याचे पर्याय शोधत आहेत. त्याचा गैरफायदा मानवी तस्करीत सहभागी असलेल्या गुन्हेगारी टोळ्या उचलत असल्याची जाणीव इंटरपोलच्या प्रमुखांनी करून दिली.

वर्षाच्या सुरुवातीला कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केल्याने युरोप व इतर देशांमध्ये जाणाऱ्या निर्वासितांची संख्या घटल्याचे समोर आले होते. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा एकदा निर्वासितांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढत चालल्याचे समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी ग्रीसच्या एका दैनिकाने तुर्की कोरोनाबाधित निर्वासितांचे लोंढे युरोपात घुसविण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर ग्रीसच्या मंत्र्यांनी, तुर्की सोमालियासारख्या देशातून योजनाबद्धरित्या युरोपात निर्वासितांना घुसवित असल्याचे उघड केले होते.

या पार्श्‍वभूमीवर इंटरपोलची कारवाई व प्रमुखांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.

leave a reply