नाटोला बायडेन यांच्याकडून अफगाणिस्तान, चीनबाबत मोठ्या निर्णयाची अपेक्षा

- नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग

बायडेनकाबुल – अफगाणिस्तानबाबतच्या अमेरिकेच्या धोरणामुळे नाटो विचित्र आणि गुंतागुंतीच्या समस्येत अडकला आहे. भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर ही कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी दिली. तर चीनच्या धोक्याबाबतही बायडेन यांच्याकडून स्पष्टोक्ती हवी असल्याचे स्टोल्टनबर्ग यांनी अमेरिकेतील लष्करी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. दरम्यान, चीन हा अमेरिका तसेच नाटोसाठी धोका ठरत असल्याची घोषणा नाटोतील अमेरिकेच्या राजदूत ‘के बेली हचीसन’ यांनी केली आहे.

बायडेनज्यो बायडेन 20 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या या शपथग्रहणाकडे युरोप व आखातातील देश, तसेच चीन आणि इराण देखील डोळे लावून बसल्याचे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. अमेरिका, कॅनडा व युरोपिय देशांची लष्करी संघटना असलेल्या नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी देखील बायडेन यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असल्याचे नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्ट केले. बायडेन यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तान आणि चीनबाबत तातडीने निर्णय घ्यावे, असे स्टोल्टनबर्ग यांनी या मुलाखतीत सुचविले आहे.

बायडेनअमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची घोषणा केली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात किमान 2500 सैनिक मायदेशी परतणार असल्याचे अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी नुकतेच जाहीर केले. पण ही सैन्यमाघार घेतल्यानंतर इराक आणि सिरिया गमावलेल्या ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये खिलाफत सुरू करण्याची शक्यता असल्याचा इशारा स्टोल्टनबर्ग यांनी दिला. त्यामुळे बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर अमेरिकेच्या सैन्यमाघारीवर फेरविचार करावा, असे आवाहन नाटोच्या प्रमुखांनी केले.

बायडेनतर चीनचा वाढत असलेला धोका लक्षात घेऊन नाटो देखील आपल्या धोरणात बदल करणार असल्याचे स्टोल्टनबर्ग यांनी स्पष्ट केले. “आपण साऊथ चायना सीपर्यंत धडक मारायची की नाही, हा प्रश्‍न आपल्यासमोर नाही. तर चीन आपल्यापर्यंत पोहोचला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आर्क्टिक, आफ्रिका तसेच नाटो सदस्यदेशांमध्ये चीनचा वाढत असलेला प्रभाव, 5जी तंत्रज्ञान, सायबरस्पेस या क्षेत्रात चीनने शिरकाव केलेला आहे”, असे सूचक उद्गार स्टोल्टनबर्ग यांनी काढले आहेत. तसेच चीनचा हा विस्तार नाटो सदस्य देशांसाठी, लोकशाहीसाठी अण्णि मानवाधिकारांसाठी धोकादायक असल्याचे स्टोल्टनबर्ग यांनी अधोरेखित केले. या पार्श्‍वभूमीवर बायडेन यांची चीनविषयक भूमिका महत्त्वाची ठरेल, याची जाणीव नाटोच्या प्रमुखांनी करून दिली.

दरम्यान, बायडेन यांनी आपल्या निवडणूक प्रचारात अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीचा विरोध केला होता. पण गेल्या आठवड्यात अमेरिकेचे भावी संरक्षणमंत्री म्हणून लॉयड ऑस्टिन यांची घोषणा केल्यानंतर, अमेरिकेला ‘कायमस्वरूपी युद्धा’तून बाहेर काढण्यासाठी ऑस्टिन यांनी निर्णय घ्यावे, असे बायडेन यांनी सुचविले होते. तर चीनबाबतची बायडेन यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. काही विश्‍लेषक बायडेन चीनधार्जिणे धोरण पुढे रेटतील, असा संशय व्यक्त केला आहे. तर बायडेन यांच्यासमोर ट्रम्प यांची चीनविरोधी धोरणे पुढे नेण्यावाचून पर्याय नसल्याचे मत काही विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply