भारत-चीन संबंध अत्यंत वाईट स्थितीत

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – ‘या वर्षात भारत आणि चीनचे संबंध अत्यंत वाईट स्थितीत पोहोचले आहेत. आत्तापर्यंत लडाखच्या एलएसीवर चीनने हजारो जवान तैनात केले असून आत्तापर्यंत यासाठी चीनने पाच वेगवेगळी कारणे समोर ठेवली आहेत’, असा ठपका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ठेवला. भारत-चीनमध्ये सीमावादाबाबत काही करार झाले होते, त्याचे पालन करण्यास चीन तयार नाही, यामुळेच ही स्थिती उद्भवली, असा आरोपही भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

भारत-चीन

ऑस्ट्रेलियाच्या एका ‘थिंक टँक’ने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारत-चीन संबंधांवर परखड भाष्य केले. दोन्ही देशांचे संबंध गेल्या 30 ते 40 किंवा त्यापेक्षाही आधीच्या काळात नव्हते, इतके विकोपाला गेले आहेत, असे जयशंकर म्हणाले. चीन दाखवित असलेली आक्रमकता याला कारणीभूत असल्याचे सांगून चीनच्या या धोरणामुळे भारतीय जनमत चीनच्या पूर्णपणे विरोधात गेले आहे. म्हणूनच चीनबरोबरील भारताचे संबंध पूर्वपदावर आणणे हे फार मोठे आव्हान बनले आहे, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली.

उभय देशांच्या सीमेवर शांतता व सौहार्द कायम राखण्यासाठी दोन्ही देशांमध्ये काही करार संपन्न झाले होते. यानुसार दोन्ही देशांनी आपल्या सीमेवर नक्की किती सैनिक तैनात करायचे, याची मर्यादा निश्‍चित करण्यात आली होती. पण चीनने या मर्यादेचे उल्लंघन करून लडाखच्या सीमेवर हजारो जवान तैनात केले. त्याचबरोबर चीन या क्षेत्रात लष्करी तयारीही करीत आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधून चीनच्या धोरणात झालेला हा बदल आकस्मिक नसल्याचे बजावले. 2008 सालापासून चीनच्या वर्तनात बदल होत गेले. एखादा देश अधिकाधिक शक्तीशाली बनत गेला की त्याचे वर्तन बदलते, याचा प्रत्यय आपल्याला चीनच्या वर्तनात झालेल्या बदलामुळे आल्याचा टोला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लगावला.

चीनच्या याच बेजबाबदार वर्तनामुळे उभय देशांचे संबंध ताणलेले आहेत, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली. त्याचवेळी सीमेवर अशांतता व अस्थैर्य असताना, दोन्ही देशांचे संबंध सुरळीत राहू शकत नाहीत, असे सांगून जयशंकर यांनी पुढच्या काळातही भारत चीनला धक्के देणारे निर्णयघेईल, असे संकेत दिले. गलवान व्हॅलीतील चीनच्या हल्ल्यानंतर भारताने चिनी कंपन्यांच्या ॲप्सवर बंदी टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी व्यापारी आघाडीवर चीनच्या कंपन्यांना धक्के देणारे निर्णय घेऊन भारताने चीनला आपल्या आक्रमकतेची किंमत चुकती करण्यास भाग पाडले होते. भारताने आपल्या विरोधात घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी चीनने जागतिक व्यापारी परिषदेत दाद मागण्याची तयारी केली होती.

दरम्यान, लडाखच्या एलएसीवर भारताला छेडून चीनने बरेच काही गमावले आहे, असे पाश्‍चिमात्य विश्‍लेषक सांगत आहेत. मुख्य म्हणजे चीनच्या या आक्रमकतेमुळे या देशाचे हेतू स्पष्ट झाले. त्याने भारताच्या चीनविषयक धोरणात फार मोठा बदल होऊन यात अधिक स्पष्टता आली, असा दावा भारतीय विश्‍लेषक करीत आहे. मुख्य म्हणजे अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांबरोबरील ‘क्वाड’ संघटनेत अधिक सक्रिय होण्याचा भारताचा निर्धार यामुळे पक्का झाल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. आधीच्या काळात भारताने या आघाडीवर दाखविलेल्या धरसोड वृत्तीमुळे बराच काळ वाया गेल्याची टीकाही याच विश्‍लेषकांनी केली होती.

पण आता भारताच्या धोरणात आलेल्या स्पष्टतेचे परिणाम दिसू लागले आहेत. चीनने आता भारताच्या विरोधात कितीही आक्रमकता दाखवून दडपण आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी क्वाडच्या सहकार्यामुळे हा देश कमालीचा असुरक्षित बनल्याचे संकेत मिळत आहेत. धोरणात्मक पातळीवर दाखविलेल्या या कणखरपणाचा फार मोठा लाभ भारताला मिळेल, असा विश्‍वास विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply