अमेरिकेत आशियाई-अमेरिकी नागरिकांवरील हल्ल्यांविरोधात निदर्शने

आशियाई-अमेरिकीवॉशिंग्टन – गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या अटलांटा शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत सहा आशियाई-अमेरिकी महिलांची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे अमेरिकेतील आशियाई वंशाच्या नागरिकांमध्ये भीती व असंतोष असून शनिवारी झालेल्या निदर्शनांमध्ये त्याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या आशियाई वंशाच्या नागरिकांनी यावेळी ‘स्टॉप आशियन हेट’च्या घोषणा दिल्या. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील एका सर्वेक्षणात चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे मत ४५ टक्के अमेरिकी जनतेने नोंदविल्याचे समोर आले होते.

आशियाई-अमेरिकीगेल्या वर्षी चीनमधून सुरू झालेल्या कोरोना साथीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. ही साथ चीनमधून पसरल्याचे उघड झाल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचा उल्लेख चायना व्हायरस असा केला होता. त्याचवेळी विविध पातळ्यांवर चीनविरोधात आक्रमक आघाडीही उघडली होती. त्यामुळे अमेरिकी जनतेत चीनविरोधात तीव्र नाराजीची भावना असून आशियाई वंशाच्या नागरिकांवर होणारे हल्ले व त्यांच्या छळाच्या घटनांना हीच पार्श्‍वभूमी असल्याचे सांगण्यात येते.

आशियाई-अमेरिकीमंगळवारी १६ मार्चला अटलांटा शहरात झालेल्या हल्ल्यामागेही हेच कारण असल्याचा दावा काहीजणांनी केला आहे. या हल्ल्यात रॉबर्ट लॉंग या २१ वर्षाच्या गौरवर्णिय तरुणाने आठ जणांची हत्या केली होती. आठपैकी सहा व्यक्ती आशियाई वंशाच्या महिला आहेत. सहापैकी चार महिला दक्षिण कोरियन असल्याचे सांगण्यात आले आहे. या हत्येनंतर आशियाई वंशाच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून स्थानिक यंत्रणा आपल्याविरोधातील वांशिक द्वेषाच्या घटनांनी दखल घेत नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

आशियाई-अमेरिकीगेल्या वर्षभरात आशियाई वंशाच्या नागरिकांवर हल्ले व वांशिक द्वेषाच्या जवळपास ३,८०० घटनांची नोंद झाली आहे. यातील ६८ टक्के घटना महिलांविरोधातील असल्याचे समोर आले आहे. अटलांटामध्ये झालेल्या हत्यांनंतर सॅनफ्रान्सिस्कोमध्ये एका ७५ वर्षाच्या आशियाई महिलेवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.

या पार्श्‍वभूमीवर, शनिवारी अटलांटासह अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये झालेली निदर्शने लक्ष वेधून घेणारी ठरतात. अमेरिकेत आशियाई वंशाच्या नागरिकांचे प्रमाण मोठे असून पारंपारिकदृष्ट्या ते डेमोक्रॅट पक्षाचे समर्थक मानले जातात. सध्या राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या नेतृत्त्वाखाली डेमोक्रॅट पक्षाची सत्ता असतानाही आशियाई वंशियावर होणारे वाढते हल्ले व त्याकडे होणारे दुर्लक्ष हे बायडेन प्रशासनाचे अपयश असल्याचे सांगण्यात येत आहे.

leave a reply