‘आयबीएसए’ची दहशतवादाविरोधात कठोर भूमिका

‘आयबीएसए’न्यूयार्क – भारत, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची त्रिपक्षीय चर्चा (आयबीएसए) पार पडली. दहशतवाद ही जागतिक पातळीवरील आपत्ती आहे. त्यामुळे जगभरात कुठेही असलेले दहशतवाद्यांचे तळ नष्टच करणे भाग आहे, अशी कठोर भूमिका ‘आयबीएसए’ने स्वीकारली आहे. यासाठी भारताने पुढाकार घेतला असून ब्राझिल व दक्षिण आफ्रिकेने त्याला दिलेले समर्थन लक्षणीय ठरते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेदरम्यान, आयबीएसएने प्रसिद्ध केलेल्या या संयुक्त निवेदनाचा प्रभाव इतर देशांवरही पडू शकतो.

संयुक्त राष्ट्रसंघाची आमसभा सुरू होण्यापूर्वीच भारताने दहशतवादाच्या विरोधातील आपली राजनैतिक पातळीवरील मोहीम अधिकच तीव्र करण्याचे संकेत दिले होते. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या इतर देशांच्या नेत्यांबरोबरील भेटीत दहशतवादाची समस्या उपस्थित केली जात असून याला या देशांकडून भारताला अपेक्षित असलेला प्रतिसाद मिळू लागला आहे. अशा परिस्थितीत भारताच्या ब्राझिल व दक्षिण आफ्रिकेबरोबरील त्रिपक्षीय चर्चेतही दहशतवादाच्या विरोधात एकजूट महत्त्वाची बाब ठरते.

जगभरात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले असून ही अतिशय चिंताजनक बाब ठरते. यामुळे दहशतवाद ही केवळ एखाद्या क्षेत्रापुरतीच नाही, तर साऱ्या जगाला भेडसावणारी समस्या असल्याचे उघड होत आहे. अशा परिस्थितीत साऱ्या जगात असलेले दहशतवाद्यांचे तळ व त्यांची आश्रय स्थाने नष्ट करण्यावाचून पर्याय नाही. यासाठी पुढाकार घेणे अत्यावश्यकच ठरते, असा दावा आयबीएसएने आपल्या निवेदनात केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवादाच्या विरोधात यंत्रणा उभी करून त्याचा प्रभावीपणे वापर करावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आलेली आहे.

दरम्यान, इतर देशांबरोबरील भारताच्या चर्चेतही अशाच स्वरुपाची भूमिका मांडण्यात येण्याची दाट शक्यता आहे. भारताकडून असे प्रयत्न केले जात असताना, दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून भारत पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की करीत असल्याचा आरडाओरडा पाकिस्तानची माध्यमे व विश्लेषक करू लागले आहेत. या मोहीमेत भारताला प्रचंड यश मिळत असून पाकिस्तान एकाकी पडल्याचे दिसत आहे. यामुळे पाकिस्तानला कुणीही राजनैतिक तसेच आर्थिक पातळीवर मदत करायला पुढे येत नाही, अशी खंत देखील पाकिस्तानची माध्यमे व विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply