अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात पाऊण टक्क्यांची वाढ

पाऊण टक्क्यांची वाढवॉशिंग्टन – बुधवारी अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात पाऊण टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर अमेरिकेतील व्याजदर 3.25 टक्क्यांवर पोहोचला असून हा 2008 सालानंतरचा उच्चांक ठरतो. यासंदर्भातील घोषणा करतानाच फेेडरल रिझर्व्हने 2023 सालापर्यंत अमेरिकेतील व्याजदर 4.6 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येतील, असे संकेतही दिले. फेडरल रिझर्व्हच्या या घोषणेचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये तीव्र पडसाद उमटले. अमेरिकेसह आशिया व युरोपमधील शेअरबाजार कोसळले असून चलनांचे मूल्यही घसरले आहे.

अमेरिकेत महागाईचा भडका उडाला असून महागाईचा दर अजूनही आठ टक्क्यांच्या वर आहे. ऑगस्ट महिन्यात 8.3 टक्के दर नोंदविण्यात आला. या वाढीनंतर फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी अमेरिकी जनतेला अधिक काही काळ वेदना सहन कराव्या लागतील, असे बजावले होते. सलग तिसऱ्यांदा पाऊण टक्क्यांची वाढ करून पॉवेल यांनी आपले वक्तव्य प्रत्यक्षात उतरविल्याचे दिसत आहे. गेल्या सात महिन्यात फेडरल रिझर्व्हकडून करण्यात आलेली ही पाचवी दरवाढ ठरली आहे.

पाऊण टक्क्यांची वाढफेडच्या या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटले. अमेरिकेसह युरोप व आशियातील शेअरबाजारांमध्ये मोठी घसरण झाली. आशियातील शेअरबाजार दोन वर्षातील नीचांकी पातळीपर्यंत खाली आले आहेत. यात जपानसह दक्षिण कोरिया, चीन व हाँगकाँगमधील शेअरबाजारांचा समावेश आहे. तर युरोपातील आघाडीच्या शेअरबाजारांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एक टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. अमेरिकी शेअरबाजारात मोठे चढउतार सुरू असून काही निर्देशांक कोसळू शकतील, असे संकेत मिळाले आहेत.

पाऊण टक्क्यांची वाढशेअरबाजारांपाठोपाठ चलन बाजारपेठेतही मोठ्या उलथापालथी सुरू झाल्या आहेत. व्याजदरवाढीच्या घोषणेनंतर जपानचे येन चलन प्रति डॉलरमागे विक्रमी 145च्या स्तरापर्यंत पोहोचले होते. जपानच्या मध्यवर्ती बँॅकेने परकीय गंगाजळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करून येनची पातळी 140पर्यंत खाली आणण्यात यश मिळविले आहे. जपानच्या मध्यवर्ती बँकेने परकीय गंगाजळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करण्याची 1998 सालानंतरची ही पहिलीच वेळ ठरते. येनपाठोपाठ ब्रिटीश पौंड तसेच युरोच्या मूल्यातही घसरण झाली. प्रति डॉलरमागे युरोचे मूल्य एकपेक्षा खाली घसरले. तर ब्रिटीश पौंड 37 वर्षातील नीचांकी पातळीवर आला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या दरवाढीनंतर युरोपातील स्वित्झर्लंड तसेच नॉर्वे या देशांनीही दरवाढीची घोषणा केली. स्विस मध्यवर्ती बँकेने आपल्या व्याजदरात 0.75 टक्क्यांची वाढ केली. गेल्या 15 वर्षात अशा रितीने वाढ करण्याची ही दुसरी वेळ ठरते. तर नॉर्वेच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्ध्या टक्क्यांची वाढ करण्यात आली. येत्या काही दिवसात ‘बँक ऑफ इंग्लंड’ही व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असून ही वाढ 0.75 ते 0.80 टक्के असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

व्याजदरवाढीची घोषणा करतानाच फेडरल रिझर्व्हने मंदीचेही संकेत दिले आहेत. मात्र महागाई रोखण्यासाठी व्याजदरवाढ कायम ठेवणार असून पुढील वर्षापर्यंत अमेरिकेतील व्याजदर 4.6 टक्क्यांपर्यंत नेण्यात येतील, असे फेडकडून सांगण्यात आले. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वाढ ठरेल, असे सांगण्यात येते. मात्र या वाढीमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला मोठ्या मंदीचा फटका बसेल, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला. अमेरिकेला मंदीचा फटका बसल्यास जागतिक अर्थव्यवस्थाही मंदीत जाण्याची भीती आहे, असे वर्ल्ड बँक तसेच नाणेनिधीने यापूर्वीच बजावले आहे.

leave a reply