इराणकडून युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा इशारा

तेहरान/व्हिएन्ना – इराणने आपल्या फोर्दो अणुप्रकल्पातील युरेनियमच्या संवर्धनाची मात्रा २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या (आयएईए) निरिक्षकांकडेच इराणने ही बाब उघड केली. हे २०१५ साली इराण व पाश्‍चिमात्य देशांमध्ये झालेल्या अणुकराराचे उल्लंघन ठरते. कारण या अणुकरारानुसार इराणच्या युरेनियम संवर्धनाचे प्रमाणात ३.६७ टक्के इतके निर्धारित करण्यात आलेले आहे. हा इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्याची घोषणा करणारे अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासाठी धक्का ठरू शकतो. तसेच यामुळे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विरोध करून इराणबरोबरील अणुकराराच्या बाजूने उभे राहणारे युरोपिय देशही अडचणीत आल्याचे दिसत आहेत.

महिन्याभरापूर्वी इराणच्या अणुकार्यक्रमातील मुख्य अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची राजधानी तेहरानजवळ हत्या करण्यात आली होती. यामुळे खवळलेल्या इराणने अणुकार्यक्रमाचा वेग वाढविण्याची घोषणा केली होती. इराणच्या संसदेत तसा कायदा पारित करण्यात आला होता. ३१ डिसेंबर रोजी इराणने पत्राद्वारे यासंबंधीची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाला कळविली आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांसाठी प्रवेश निषिद्ध असलेल्या ‘फोर्दो’ या येथील प्रकल्पात युरेनियमचे संवर्धन करणार असल्याचे आयोगाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. इराण कधी युरेनियमचे संवर्धन सुरू करणार, याचा काळ, वेळ स्पष्ट केलेले नाही, असेही या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी अणुकरारातून माघार घेतल्यानंतर इराणने युरेनियम संवर्धनाची मात्रा ४.५ टक्क्यांपर्यंत नेल्याचे जाहीर केले होते. अशा परिस्थितीत, युरेनियमच्या संवर्धनाची मात्रा २० टक्क्यांपर्यंत नेण्याची इराणची घोषणा ही अमेरिका, इस्रायलसह पाश्‍चिमात्य देशांसाठी इशारा असल्याचा दावा माध्यमे करीत आहेत. इराणचा अणुकार्यक्रम अण्वस्त्रनिर्मितीसाठी असल्याचा आरोप अमेरिका व इस्रायल करीत आहेत. अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी इराणला युरेनियमच्या संवर्धनाची मात्रा ९० टक्क्यांपर्यंत न्यावी लागेल.

युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर ९० टक्क्यांचे लक्ष्य गाठणे इराणसाठी फारसे अवघड नसेल, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. त्यामुळे युरेनियमच्या संवर्धनाची मात्रा २० टक्क्यांपर्यंत नेण्याबाबत इराणची घोषणा अतिशय गंभीर असल्याचे इसायलचे म्हणणे आहे. याआधी इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदी नेजाद यांच्या कार्यकाळात इराणने युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला होता. यावर चिंता व्यक्त करून इस्रायलने इराणवर हल्ला चढविण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणबरोबर नवा अणुकरार करण्याची तयारी दाखविली होती. पण त्याआधीच इराणने युरेनियमच्या संवर्धनाबाबत घोषणा करून बायडेन यांच्यासह अणुकराराचे समर्थन करणार्‍या युरोपिय देशांची कोंडी केली आहे. त्यातही विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेवर असताना इराणने ही घोषणा केली आहे.

leave a reply