इस्लामाबादच्या दिशेने निघालेल्या संतप्त निदर्शकांमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार धोक्यात

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सरकारने केलेली विनंती आणि नंतर दिलेल्या धमक्या यांची पर्वा न करता ‘तेहरिक-ए-लबैक’चे हजारो निदर्शक राजधानी इस्लामाबादच्या दिशेने पुढे निघाले आहेत. आता या निदर्शकांवर कठोर करवाई केल्याखेरीज सरकारसमोर पर्याय नसल्याचे पाकिस्तानचे सरकार सांगत आहे. मात्र ही संघटना भारताच्या इशार्‍यावर काम करीत असल्याचे गंभीर आरोप करून पंतप्रधान इम्रान खान यांच्या काही मंत्र्यांनी लबैकबरोबर वाटाघाटींची शक्यता निकालात काढली. लबैकवर केल्या जाणार्‍या या आरोपांचे पुरावे द्या, अशी आक्रमक मागणी आता या संघटनेचे निदर्शक करीत आहेत. यामुळे पाकिस्तानात भयंकर रक्तापात होऊन या देशात अस्थैर्य माजण्याची चिंता माध्यमांनी व्यक्त केली आहे.

साद रिझवी हा लबैकचा नेता सध्या पाकिस्तानी यंत्रणांच्या ताब्यात आहे. त्याची सुटका व आपल्या प्रमुख मागण्या मान्य झाल्याखेरीज इस्लामाबादमधून माघार घेणार नाही, असा इशारा लबैकचे समर्थक देत आहेत. फ्रान्सच्या राजदूतांची पाकिस्तानातून हकालपट्टी व फ्रान्सबरोबरचे राजनैतिक संबंध पूर्णपणे तोडून टाकण्याची मागणी लबैकचे निदर्शक करीत आहेत. यापैकी रिझवी याची सुटका करण्याची तयारी पाकिस्तानच्या सरकारने दाखविली होती. पण सध्या फ्रान्सचे राजदूत पाकिस्तानात नाहीत, असे सांगून फ्रान्सबरोबरील संबंध कुठल्याही परिस्थितीत तोडता येणार नाही, असे इम्रान खान यांचे सरकार लबैकला सांगत आहे. मात्र लबैकचे निदर्शक यावर माघार घ्यायला तयार नाहीत.

म्हणूनच गुजरानवाला इथून राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारण्यासाठी लबैकचे हजारो समर्थक आगेकूच करीत आहेत. या निदर्शनांना काही ठिकाणी हिंसक वळण लागले व यात पाकिस्तानच्या पोलिसांचा बळी गेल्याचे सांगितले जाते. या बळींची संख्या उघड केली जाते, त्याहून कितीतरी अधिक असल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे. तर लबैकचे समर्थक मात्र आपल्यावरच पोलिसांनी हल्ला चढविल्याचे सांगून हिंसाचाराला पोलिसांनीच चिथावणी दिल्याचे आरोप केले आहेत. एकेकाळी लबैकच्या निदर्शनांना पूर्ण पाठिंबा देणारे इम्रान खान आता मात्र त्यांच्या मागण्या मान्य करता येणार नाही, असे सांगत आहेत. पण याआधी लबैकने केलेली निदर्शने मागे घेण्याच्या शर्तीवर इम्रान खान यांच्या सरकारने त्यांच्या सार्‍या मागण्या मान्य केल्या होत्या. एकदा मागण्या मान्य केल्यानंतर, त्यापासून माघार घेण्याचे गंभीर परिणाम इम्रान खान यांना सहन करावे लागतील, असा इशारा पाकिस्तानचे कट्टरपंथिय देत आहेत.

याआधीही लबैकच्या निदर्शकांनी पाकिस्तानची राजधानी वेठीस धरली होती. मात्र यावेळी निदर्शक कुठल्याही स्वरुपाची तडजोड करण्यास तयार नाहीत. त्यातच पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी लबैकला भारताकडून निधी मिळत असल्याचे गंभीर आरोप केले. या देशद्रोहाच्या आरोपांमुळे लबैकचे समर्थक अधिकच खवळले आहेत. हा आरोप सिद्ध करणारे पुरावे द्या, अशी मागणी लबैकने केली. पाकिस्तानचे विरोधी पक्षनेेते, माजी राजनैतिक अधिकारी, पत्रकार व विश्‍लेषकांनी लबैकवर असे आरोप करणार्‍या पाकिस्तानच्या सरकारचे वाभाडे काढले आहेत.

काही महिन्यांपूर्वी लबैकचे समर्थन करणारे पाकिस्तानच्या सरकारमधील मंत्री व पंतप्रधान इम्रान खान आता मात्र या संघटनेवर देशद्रोहाचे आरोप करीत आहेत. मग अशा संघटनेशी आत्तापर्यंत पाकिस्तानचे सरकार वाटाघाटी कशासाठी करीत होते? असा सवाल विरोधी पक्ष तसेच माध्यमांनी केला. प्रचंड दडपणाखाली आलेले इम्रान खान यांचे सरकार अशा प्रश्‍नांच्या सरबत्तीला समाधानकारक उत्तरे देऊ शकलेले नाही. यामुळे लबैकचे समर्थक आणि आपले विरोधक यांच्या कचाट्यात सापडलेले पाकिस्तानचे सरकार शक्य त्या मार्गाने हे संकट टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. काही आठवड्यांपूर्वी, पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना आव्हान देणार्‍या कारवाया व विधाने केली होती. त्याचे पडसाद उमटले असून लबैकच्या मागे पाकिस्तानी लष्कराने आपली ताकद उभी केल्याचे दावे काहीजण करीत आहेत. इम्रान खान यांना सत्तेवरून बेदखल केल्यानंतर अथवा त्यांना त्यांची जागा दाखविल्यानंतरच ही निदर्शने थांबतील, अशी दाट शक्यता समोर येत आहे.

leave a reply