जी२० परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चा

रोम – इटलीच्या रोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या जी२० च्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, यांच्याशी भेट झाली. ख्रिस्तधर्मियांचे प्रमुख धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांची पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली. पोप फ्रान्सिस यांना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भारतभेटीचे आमंत्रण दिले आहे.

जी२० परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चाव्हॅटिकन सिटीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल देखील यावेळी उपस्थित होते. आदरणीय पोप फ्रान्सिस यांची भेट झाली व त्यांच्याशी अनेक मुद्यांवर चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. तसेच पोप फ्रान्सिस यांना आपण भारतभेटीचे आमंत्रण दिल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

तसेच पंतप्रधान मोदी यांची रोममध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भेट झाली. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर पंतप्रधान मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली असून ही चर्चा फलदायी ठरल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारत व फ्रान्स यांचे अनेक क्षेत्रात व्यापक सहकार्य प्रस्थापित झाले आहे व आजची चर्चा या सहकार्याला अधिकच चालना देईल, असा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

सिंगापूरच्या पंतप्रधानांबरोबर पार पडलेल्या द्विपक्षीय चर्चेवरही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. तसेच जी-२०च्या बैठकीत जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. रविवारी पंतप्रधान मोदी ग्लास्गोला भेट देणार असून हवामानबदलाबाबत होणार्‍या परिषदेला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, जागतिक हवामानबदल, कोरोनाच्या साथीनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न, अफगाणिस्तानातील परिस्थिती आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तणाव, या सार्‍यांच्या पार्श्‍वभूमीवर, इटलीच्या रोममध्ये होत असलेल्या जी२० परिषदेचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या परिषदेचा वापर करून पंतप्रधान मोदी भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रभाव अधिकच वाढवत आहेत, असा दावा पाकिस्तानच्या एका विश्‍लेषकाने केला.

दरम्यान, भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी पुढच्या वषी भारत कोरोनाच्या सुमारे पाच अब्ज लसी तयार करणार असल्याची घोषणा केली. या लसी जगभरात वितरित केल्या जातील, असे परराष्ट्र सचिवांनी जाहीर केले आहे. कोरोनाविरोधी लढ्यात भारताने जगासाठी दिलेले हे योगदान असेल, असे श्रिंगला पुढे म्हणाले. जी२० परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर, भारताच्या परराष्ट्र सचिवांनी ही घोषणा केल्याचा दावा काही वृत्तसंस्थांनी केला आहे.

leave a reply