सिरियातील हवाईहल्ल्याद्वारे अमेरिकेने इराणला इशारा दिला

- अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा दावा

वॉशिंग्टन – सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले चढविणाऱ्या दहशतवाद्यांना संपविण्यात यश मिळाले आहे. या कारवाईद्वारे अमेरिकी जवानांना लक्ष्य करणाऱ्या इराणला योग्य तो संदेश मिळाला असेल, असा दावा अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. तसेच यापुढेही सिरियातील दहशतवादी ठिकाणे व त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केले जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

US-airstrike-on-Syriaगेल्या आठवड्यात 15 ऑगस्ट रोजी सिरियातील ‘देर अल-झोर’ भागात अमेरिकेच्या लष्करी तळावर जोरदार हल्ले झाले. अमेरिकेच्या लष्कराने या हल्ल्यासाठी वापरलेले ड्रोन पाडले होते. सुरुवातीला अमेरिकेने या हल्ल्यासाठी कुणालाही जबाबदार धरण्याचे टाळले होते. पण या ड्रोन हल्ल्यामागे इराणसंलग्न दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचे उघड झाल्यानंतर इराणबरोबर अणुकरारासाठी धडपडत असलेल्या बायडेन प्रशासनावर जोरदार टीका झाली.

दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेने सिरियातील लष्करी तळावर हवाई हल्ले चढविले. यामध्ये इराणसंलग्न दहशतवादी संघटनेचे चार दहशतवादी ठार झाले. तर सात रॉकेट लाँचर्स नष्ट करण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या ‘सेंटकॉम’ने दिली. तसेच ‘अपाचे हेलिकॉप्टर्स’, ‘एसी-130’ गनशिप आणि एम777 तोफा नष्ट केल्याचा दावा केला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली, अशी घोषणा अमेरिकी यंत्रणा करीत आहेत. अमेरिकेच्या सेंकॉमने या हवाईहल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला.

सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यांसाठी जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांवर हवाईहल्ले चढवून इराणला योग्य तो संदेश दिल्याचा दावा अमेरिका करीत आहे. तसेच यापुढेही इराण आणि इराणसंलग्न दहशतवाद्यांवरील कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे अमेरिकेच्या संरक्षणविषयक धोरणात उपमंत्री कॉलिन काहल यांनी जाहीर केले. तर सेंटकॉमच्या प्रमुखांनी इराणचा थेट उल्लेख टाळून दहशतवादी संघटना व त्यांच्या समर्थकांवर अमेरिका कारवाई करीत राहील, असे घोषित केले.

दरम्यान, अमेरिका व इराणमधील अणुकरार अगदी अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या काही दिवसात हा अणुकरार शक्य असल्याचा दावा अमेरिकन माध्यमांकडून केला जात. पण इस्रायल तसेच आखाती मित्रदेश इराणबरोबरच्या या अणुकरारामुळे बायडेन प्रशासनावर आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच अमेरिका व इराणमधील या अणुकराराशी आपला संबंध नसल्याचे इस्रायल ठणकावून सांगत आहेत. अशा परिस्थितीत, सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनेवर कारवाई करून बायडेन प्रशासन इस्रायलसह आपल्या आखातातील मित्रदेशांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी अमेरिकेने सिरियात हा हल्ला चढविल्याचे दिसते.

leave a reply