पंतप्रधानांच्या हस्ते सामरिकदृष्ट्या महत्वाच्या ‘अटल टनेल’चे लोकार्पण

नवी दिल्ली – जगातील सर्वात लांब भुयारी मार्ग असलेल्या ‘अटल टनेल’चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ‘अटल टनेल’चे उदघाटन ऐतिहासिक क्षण आहे आणि हा भुयारी मार्ग भारतीय अभियांत्रिकी आश्चर्य असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘अटल टनेल’ने सीमा क्षेत्रातील पायभूत सुविधांना बळकटी दिल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

'अटल टनेल'

”या भुयारी मार्गाने केवळ अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण झाले नसून सामान्य हिमाचल प्रदेशवासियांच्या स्वप्नाचीही पूर्ती झाली आहे. यामुळे मानली ते लेहमधील अंतर चार तासाने कमी होणार आहे. या पर्वतीय क्षेत्रात चार तासाचे अंतर किती महत्वाचे आहे, हे येथील स्थानिकांना उत्तमरीत्या ठाऊक आहे. ‘अटल टनेल’ येथील तरुणांसाठी रोजगाराच्या साधी उपलब्ध करून देईल. या भुयारी मार्गामुळे लाहोल-स्पिती आणि पांगी या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना आपला शेती माल वेळेत बाजारापर्यंत पोहोचवता येईल”’, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनीही या टनेलमुळे सीमक्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट केल्याचे म्हटले आहे. तसेच देशाच्या सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून सीमा भागातील पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांचे काम वेगाने सुरु आहे. केवळ हिमाचलमध्ये नाही इतर भागातही रस्ते आणि पूल बनत असून त्याचा लाभ सामान्य नागरिकांबरोबर सैनिकांना मिळत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी दौलत बेग ओल्डीचा (डीबीओ) उल्लेख केला. लडाखमधील दौलत बेग ओल्डी येथील सामरिकदृष्ट्या महत्वाची धावपट्टी ४० ते ४५ वर्षे बंद होती. ही धावपट्टी सुरु करण्यात आली, असे पंतप्रधान यांनी म्हटले.

जगातील सर्वात उंचीवरील धावपट्टी डीबीओमध्ये असून चीनने याच भागात सुरु असलेल्या पायाभूत सुविधांची कामे रोखण्यासाठी लडाखमध्ये घुसखोरी केल्याचे दावे केले जातात. युद्ध भडकल्यास या धावपट्टीचा मोठा लाभ भारताला मिळेल, असे सांगितले जाते. तसेच डीबीओ येथे १६ हजार फूट उंचीवर बांधण्यात आलेला रास्ता सामरिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे. डीबीओपासून चीनबरोबरील नियंत्रण रेषा केवळ सात किलोमीटर लांब आहे. यामुळे ‘डीबीओ’चा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी चीनला संदेश दिल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, सुमारे तीन हजार मीटर उंचीवर उभारण्यात आलेला अटल टनेल व्यूहरचनात्मकदृष्ट्या अतिशय महत्वाचा ठरणार आहे. हिवाळ्यात या भागात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने हा भाग इतर भागापासून तुटतो. मात्र या भुयारी मार्गामुळे वर्षाचे बारा महिने मानली व लेह जोडले जाईल. यामुळे लडाखमध्ये चीन सीमेवर तैनात जवानांपर्यंत वेगाने रसद पोहोचवता येणार आहे. लष्करी वाहने आणि रणगाडे सुद्धा या टनेलमधून सहज जाऊ-येऊ शकतील. याद्वारे या भुयारी मार्गाचे सामरिक महत्व अधोरेखित होते. विशेष म्हणजे लडाखमधील सीमेवर भारत आणि चीनमध्ये कधीही संघर्ष भडकेल, अशी स्थिती आहे. अशावेळी ‘अटल टनेल’ सुरु होणे लक्षवेधी ठरत आहे.

leave a reply