अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ल्यात १५ जणांचा बळी

काबूल – अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील गनीखेल जिल्ह्यातल्या सरकारी इमारतीला लक्ष्य करुन दहशतवाद्यांनी घडविलेल्या कार बॉम्बस्फोटात १५ जणांचा बळी गेला. यामध्ये बहुतांश सुरक्षादलाच्या जवानांचा समावेश आहे. या जिल्ह्यात तालिबानचे वर्चस्व असल्यामुळे हा हल्ला तालिबाननेच घडविल्याचा संशय अफगाणिस्तान सरकारने व्यक्त केला आहे. दरदिवशी तालिबान सर्वसामान्य नागरिकांचा बळी घेऊन सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करीत असल्याचे अफगाणी सरकारने म्हटले आहे.

१५ जणांचा बळी

शनिवारी दुपारच्या सुमारास गनीखेल जिल्ह्यातल्या प्रशासकीय इमारती आणि काही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करुन दहशतवाद्यांनी कारच्या सहाय्याने बॉम्बस्फोट घडविला. जिल्हा मुख्यालयाच्या इमारतीच्या गेटजवळच हा स्फोट झाला. यात १५ जणांचा बळी गेला असून ३० जण जखमी झाले. या स्फोटानंतर हल्लेखोरांनी इमारतीच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षादलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना ठार केले. याआधी मंगळवारी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १४ जणांचा बळी गेला होता. कतारच्या दोहामध्ये अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये शांतीचर्चा सुरु झाल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानात ६५० हल्ले केले असून यात ६९ जणांचा बळी गेल्याचे सांगितले जाते. तर या हल्ल्यांमध्ये १४१ जण जखमी झाले आहेत.

तालिबानच्या या वाढत्या हल्ल्यांमुळे अफगाण आणि तालिबानमधल्या शांतीचर्चेत प्रगती झालेली नाही. दरम्यान, अफगाणिस्तानातील अमेरिका आणि नाटोचे कमांडर जनरल स्कॉट मिलर यांनी तालिबानला हिंसाचार कमी करण्याचे आवाहन केले आहे. या हिंसाचाराचे पडसाद अफगाणिस्तान- तालिबान शांतीचर्चेवर पडत असल्याचे जनरल मिलर यांनी म्हटले आहे.

leave a reply