‘टीडीएस’मध्ये २५ टक्के कपात, आयकर परताव्याच्या मुदतीत वाढ

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) –  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेतना  व्यतिरिक्त देय रकमेवर (नॉन सॅलरीड पेमेंट) लागणारा टीडीएस २५ टक्क्यांनी कमी केला आहे. तसेच आयकर परतावा भरण्याची मर्यादाही नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. बुधवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजपैकी काही भागाची माहिती देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी ही घोषणा केली. ‘टीडीएस’ आणि ‘टीसीएस’ बाबतच्या निर्णयामुळे रोखता ५० हजार कोटींनी वाढणार आहे.

‘टीडीएस’ (टॅक्स डीडक्टेड ऍट सोर्स) आणि ‘टीसीएस’चे  (टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स) दर ३१ मार्च २०२१ पर्यंत २५ टक्क्यांनी घटविण्यात आले आहेत. मात्र ही कर कपात सर्वांसाठीच लागू नसेल. नॉन सॅलरीड पेमेंटवर ‘टीडीएस’ आणि ठराविक पावत्यांसाठी  ‘टीसीएस’ची ही कर कपात लागू होणार आहे. 
एखाद्या व्यक्तीला १०० रुपये  ‘टीडीएस’ किंवा  ‘टीसीएस’ लागत असल्यास त्याला ७५ रुपयेच द्यावे लागतील, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी याची माहिती देताना सांगितले. कॉन्ट्रॅक्ट, व्यवसायिक शुल्क, व्याज, भाडे, डिव्हिडंट, कमीशन, ब्रोकरेजचा भरणा करताना ही ‘टीडीएस’ कपात लागू होईल. केवळ ‘ नॉन सॅलरीड पेमेंट’साठीच ही कर कपात करण्यात आली असली तरी यामुळे करदात्यांचे  ५० हजार कोटी रुपये वाचणार आहेत. यामुळे रोखता आणखी वाढेल. आयकर परतावा भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

leave a reply