युरेनियमचे संवर्धन वाढवून इराण इस्रायलचे दोन्ही हात कलम करील

- इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी

युरेनियमचे संवर्धनतेहरान – ‘‘‘आयआर-६’ या प्रगत सेंट्रिफ्यूजेसद्वारे युरेनियमचे संवर्धन ६० टक्क्यांपर्यंत नेऊन इराण आपल्याविरोधात कारस्थाने करणार्‍या इस्रायलचे दोन्ही हात छाटून टाकेल. युरेनियमचे संवर्धन इस्रायलच्या सैतानी कारवायांना इराणचे हेच उत्तर असेल’’, अशी घोषणा इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी केली. इराणच्या नातांझ अणुप्रकल्पातील घटना हा आण्विक दहशतवादच होता, असा आरोप राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी केला. त्याचवेळी अणुकराराचे भवितव्य अमेरिकेच्या हातात असल्याचा इशाराही इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे.

नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या घटनेने इराण बेचैन झाल्याचे दिसत आहे. रविवारी सकाळी सदर प्रकल्पात झालेला ब्लॅकआऊट हा एक अपघात असल्याचे दावे करणार्‍या इराणने यामागे इस्रायलच असल्याचे आरोप उघडपणे सुरू केले आहेत. आपल्या अणुप्रकल्पावरील हल्ला म्हणजे आण्विक दहशतवाद असल्याचा ठपका इराणने ठेवला होता. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी देखील बुधवारी हाच आरोप करताना इस्रायलने इराणला मोठे नुकसान पोहोचविण्याची योजना आखली होती, असे सांगितले.

युरेनियमचे संवर्धनसध्या व्हिएन्ना येथे अमेरिका आणि इराणमध्ये अणुकरारावर अप्रत्यक्ष चर्चा सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी या चर्चेचा उल्लेख केला. ‘सदर चर्चेत इराण अपयशी ठरावा, अमेरिकेशी वाटाघाटी करताना इराणचे हात रिते रहावे, यासाठी इस्रायलने नातांझ अणुप्रकल्पात हल्ला चढविण्याची योजना आखली होती. पण इराणचे हात भरलेलेच राहिले’, असे सांगून नातांझमधील घटनेनंतर इराणचे काहीच बिघडले नसल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी केला.

‘‘नातांझ प्रकल्पात नष्ट झालेल्या ‘आयआर१’ सेंट्रिफ्यूजेसच्या जागी प्रगत ‘आयआर-६’ सेंट्रिफ्यूजेसचा वापर करण्यात येईल. इराण युरेनियमचे संवर्धन ६० टक्क्यांपर्यंत नेईल. या दोन्ही घटनांमुळे इराणविरोधात उठलेले इस्रायलचे दोन्ही हात कलम केले जातील. इस्रायलच्या सैतानी कारवायांना इराणने दिलेले हे उत्तर ठरेल’, अशी घोषणा रोहानी यांनी केली.

यानंतर राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी व्हिएन्ना येथील चर्चेत सहभागी झालेल्या अमेरिकेसमोर इराणला निर्बंधातून मुक्त करण्याची मागणी केली. अमेरिकेने पूर्ण निर्बंध काढले तरच इराण २०१५ सालच्या अणुकराराचे पालन करील. त्यामुळे या अणुकराराचे भवितव्य आता अमेरिकेच्याच हातात असल्याचे सांगून रोहानी यांनी इराण मागे हटणार नसल्याचे ठणकावले.

दरम्यान, अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन एवढ्या मोठ्या संख्येने वाढविण्याची इराणच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा २०१५ सालच्या अणुकराराचे उल्लंघन ठरते, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. पण अमेरिकेने आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय इराण आपल्या अणुकार्यक्रमात कुठलाही बदल करण्यास तयार होणारच नाही. राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी अमेरिकेला दिलेल्या नव्या इशार्‍यातून ही बाब नव्याने स्पष्ट होत आहे.

leave a reply