भारत-ऑस्ट्रेलियाचा द्विपक्षीय सहकार्य व्यापक करण्याचा निर्धार

नवी दिल्ली – ‘भारत व ऑस्ट्रेलिया परस्परांचे घनिष्ठ मित्र आहेत. क्रिकेट स्टेडियममध्ये भारत व ऑस्ट्रेलिया एकमेकांशी झुंज देतात खरे. पण प्रत्यक्षात दोन्ही देश एकत्र येऊन अधिक चांगले जग विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरील द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषद संबोधित करताना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारताचे महत्त्व अधोरेखित केले.

भारत-ऑस्ट्रेलियाचा द्विपक्षीय सहकार्य व्यापक करण्याचा निर्धारचार दिवसांच्या भारतभेटीवर आलेल्या पंतप्रधान अल्बानीज यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये भारत व ऑस्ट्रेलियामधील ‘कॉम्प्रिहेन्सीव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन’ करारावर चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये याआधीच मुक्त व्यापारी करार संपन्न झालेला आहे. पण ‘कॉम्प्रिहेन्सीव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन’मुळे भारत व ऑस्ट्रेलियामधील व्यापार प्रचंड प्रमाणात वाढेल, असे दावे केले जातात. या वर्षाच्या अखेरपर्यंत याबाबतचा करार होईल, असा विश्वास पंतप्रधान अल्बानीज यांनी व्यक्त केला आहे. तसेच भारताबरोबरील संरक्षणविषयक भागीदारी अधिकच व्यापक करण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक असल्याचे पंतप्रधान अल्बानीज यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच सौरऊर्जा व हायड्रोजनच्या क्षेत्रात भारताशी सहकार्य वाढविण्याची ऑस्ट्रेलियाची तयारी आहे. या दोन्ही क्षेत्रांसाठी अतिशय प्रगत व गुंतागुंतीचे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. यामुळे या क्षेत्रात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे सहकार्य आवश्यक ठरते. या क्षेत्रासाठी लागणाऱ्या खनिजांचे भांडार ऑस्ट्रेलियाकडे आहे, ही बाब यावेळी पंतप्रधान अल्बानीज यांनी लक्षात आणून दिली.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवाया चिंताजनक पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. त्याविरोधात भारत व ऑस्ट्रेलिया एकमेकांना सहकार्य करीत असल्याचे संकेत यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. पंतप्रधान अल्बानीज यांच्याबरोबरील आपल्या चर्चेत सागरी सुरक्षा व सुरक्षाविषयक सहकार्याचा मुद्दा होता, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. याबरोबरच भारताने संरक्षणाच्या क्षेत्रात ऑस्ट्रेलियाबरोबर काही महत्त्वपूर्ण करार केलेले आहेत, याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी करून दिली. यामध्ये ‘लॉजिस्टिक सर्पोट’ कराराचा व सुरक्षाविषयक माहितीच्या आदानप्रदानाच्या सहकार्याचाही समावेश असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. पुढच्या काळात या सहकार्याची व्याप्ती अधिकच वाढेल, असा दावा भारताच्या पंतप्रधानांनी केला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाबरोबरील भारताच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियात काही गटांकडून भारतीयांच्या प्रार्थनास्थळावर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान अल्बानीज यांच्याशी आपण यासंदर्भात चर्चा करून या हल्ल्यांवर गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

भारत व ऑस्ट्रेलियाच्या धोरणात्मक द्विपक्षीय सहकार्यामध्ये संरक्षणविषयक सहकार्याला असाधारण स्थान असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच कुठल्याही आव्हानांना दाद न देणारी भक्कम पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी भारत व ऑस्ट्रेलिया वचनबद्ध असल्याचे उभय देशांच्या पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.

थेट उल्लेख केला नसला तरी इंडो-पॅसिफिक व पर्यायी पुरवठा साखळीचा उल्लेख करून चीनच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी भारत व ऑस्ट्रेलिया करीत असल्याचे पंतप्रधान अल्बानीज यांच्या या भारतभेटीत स्पष्ट झाले आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार देश असलेल्या चीनबरोबर संबंध बिघडल्यानंतर ऑस्ट्रेलिया भारताकडे चीनचा पर्याय म्हणून पाहत आहे. इतकेच नाही तर इतर देशांनी देखील चीनचा पर्याय म्हणून भारताकडे पहावे, असे आवाहन ऑस्ट्रेलियाचे नेते आंतरराष्ट्रीय पातळीवर करीत आहेत.

हिंदी English

leave a reply