सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीबाबत भारत व अमेरिकेमध्ये सहकार्य करार

नवी दिल्ली – भारत आणि अमेरिकेमध्ये सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीबाबत सामंजस्य करार संपन्न झाला. भारताचे व्यापार व उद्योगमंत्री पियूष गोयल आणि अमेरिकेच्या व्यापारमंत्री जिना रायमोंडो यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यानुसार दोन्ही देश सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी सहकार्य करणार आहेत. तसेच यासंदर्भातील संशोधनाच्या आघाडीवर भारत व अमेरिका एकमेकांना सहाय्य करणार आहेत. या सामंजस्य करारामुळे सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीची सशक्त पुरवठा साखळी उभी राहिल, असा विश्वास केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला आहे.

सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीबाबत भारत व अमेरिकेमध्ये सहकार्य करारकोरोनाची साथ आल्यानंतर, जगाची फॅक्टरी मानल्या जाणाऱ्या चीनमधील उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले होते. याचा जबरदस्त फटका इतर देशांच्या उत्पादन क्षेत्राला बसला. चीनमधील उत्पादन थंडावल्याने सेमीकंडक्टर्सची निर्मिती थांबली. आजच्या काळात कॉम्प्युटर्स व मोबाईलपासून मोटारीपर्यंत जवळपास प्रत्येक उत्पादनामध्ये सेमीकंडक्टर्सची आवश्यकता भासते. त्यामुळे याचे उत्पादन थंडावल्याने अर्थव्यवस्थेवर झालेले दुष्परिणाम अमेरिका व युरोपिय देशांना देखील टाळता आले नव्हते. त्यामुळे पुढच्या काळात सेमीकंडक्टर्स तसेच इतर गोष्टींचे उत्पादन व त्याची पुरवठा साखळी यासाठी एकट्या चीनवर अवलंबून राहता येणार नाही, याची जाणीव जगाला झाली.

म्हणूनच विकसित देशांनी ‘रिझिलियंट’ अर्थात कुठल्याही संकटांना दाद न देणारी सशक्त पुरवठा साखळी उभी करण्याची तयारी केली. अशा पुरवठा साखळीचे केंद्र म्हणून भारत हा समर्थ पर्याय ठरतो, असा निष्कर्ष अमेरिकेसहीत युरोपिय देश देखील पोहोचले आहेत. पुढच्या काळात चीन जाणूनबुजून पुरवठा साखळी खंडीत करील व जगाच्या समस्या वाढविल, अशी चिंता विकसित देशांना वाटत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी अमेरिकेने ‘चीप्स अँड सायन्स ॲक्ट’ २०२२ साली मंजूर केला होता. या कायद्यानुसार अमेरिकेतल्या सेमीकंडक्टर उद्योगाला निधी पुरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सेमीकंडक्टर उद्योगाकडे अमेरिकेसह विकसित देश इतक्या संवेदनशीलतेने पाहत असताना, अमेरिका व भारतामध्ये झालेला हा सामंजस्य करार धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण भारताने देखील सेमीकंडक्टरच्या देशांतर्गत निर्मितीसाठी ‘सेमीकंडक्टर मिशन’ हाती घेतले आहे. २०३० सालापर्यंत भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाची उलाढाल तब्बल १०० अब्ज डॉलर्सच्याही पुढे जाईल, असे दावे केले जातात. त्यामुळे भारत या उद्योगाच्या विकासाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. म्हणूनच अमेरिकेला देखील सेमीकंडक्टर्सची निर्मिती व त्यावरील संशोधनासाठी भारताशी सहकार्य करणे आवश्यक वाटू लागले आहे.

यामुळे सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रातील सशक्त पुरवठा साखळी उभी राहिल व त्याचे दोन्ही देशांना लाभ मिळतील, असा दावा व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी केला. तर उभय देशांमधील हा करार आपल्या उत्पादन क्षेत्राचा विकास करण्याच्या तयारीत असलेल्या भारतासाठी लाभदायी ठरेल, असे अमेरिकेच्या व्यापारमंत्री जिना रायमोंडो यांनी म्हटले आहे.

हिंदी English

 

leave a reply