भारत आणि बांगलादेशला स्थैर्य व शांतता अपेक्षित आहे

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

ढाका – भारत आणि बांगलादेशला स्थैर्य, प्रेम व शांती अपेक्षित आहे, अस्थैर्य, दहशतवाद आणि अराजक नाही, अशा शब्दात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी व बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडल्यानंतर दोन्ही देशांमधील सहकार्याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय तसेच करारांची घोषणा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी १२ लाख कोरोनाप्रतिबंधक लसींचे व १०९ जीवनरक्षक ऍम्ब्युलन्स पंतप्रधान हसिना यांच्याकडे प्रतिकात्मकरित्या सोपविल्या. त्याचवेळी भारत व बांगलादेशमधला विवाद्य मुद्दा असलेल्या तिस्ता नदीच्या पाणीवाटपाबाबतही पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशाला आश्‍वस्त केले.

पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजिबूर रेहमान यांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी पंतप्रधान शेख हसिना उपस्थित होत्या. याबरोबरच दोन्ही देशांमध्ये मिताली एक्सप्रेस नावाची प्रवासी ट्रेन सुरू करण्यात आली असून ती ढाका ते जलपायगुडी दरम्यान धावेल. दोन्ही देशांमध्ये सुरू झालेली ही तिसरी रेल्वे ठरते. तसेच पंतप्रधान मोदी यांनी १२ लाख कोरोनाप्रतिबंधक लसींचे प्रतिकात्मक हस्तांतरण पंतप्रधान शेख हसिना यांना केले. तसेच १०९ जीवनरक्षक ऍम्बुलन्स प्रतिकात्मकरित्या बांगलादेशच्या पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यात आल्या. याचा दाखला देऊन भारताच्या परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांनी भारताच्या नेबरहूड फर्स्ट धोरणाची प्रशंसा केलेली आहे, अशी माहिती दिली. तसेच ६ डिसेंबर हा भारत व बांगलादेशमधील मैत्रीदिन म्हणून साजरा केला जाईल, असे श्रिंगला यांनी घोषित केले. ६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पहिल्यांदाच बांगलादेशाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली होती. त्याचे औचित्य साधून हा दिवस उभय देशांमधील मैत्रीदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी घेतल्याचे श्रिंगला म्हणाले.

याबरोबरच भारत व बांगलादेशच्या अंतराळ क्षेत्रातील सहकार्यावरही उभय पंतप्रधानांच्या चर्चेत सहमती झाली. तसेच दोन्ही देशांमधील विवाद्य मुद्दा असलेल्या तिस्ता नदीच्या पाणीवाटपाबाबत बांगलादेशचे हित लक्षात घेतले जाईल, असे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा बांगलादेशाला दिले आहे. दरम्यान, आपल्या या दौर्‍यात पंतप्रधान मोदी यांनी गोपालगंज येथील मथुआ समुदायाला संबोधित केले. भारत आणि बांगलादेशाला स्थैर्य, प्रेम आणि शांती अपेक्षित आहे, अस्थैर्य, दहशतवाद आणि अराजक नाही, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. दोन्ही देशांना आपल्या विकासाद्वारे प्रगतीशील जग पाहायचे आहे, असे सांगून उभय देशांचा प्राधान्यक्रम एकसमान असल्याचा दावा केला. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या बांगलादेशमधील सत्खीरा येथील जशरेश्‍वरी कालीमंदिरात जाऊन दर्शन घेतले. यासाठी बांगलादेशच्या सरकारने केलेल्या सहकार्याची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

leave a reply