अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर तालिबान अफगाणिस्तानचा ताबा घेईल

- अमेरिकी गुप्तचर यंत्रणांचा इशारा

वॉशिंग्टन/काबुल/पॅरिस – ‘अफगाणिस्तानात संयुक्त सरकार स्थापनेच्या आधी अमेरिकेने सैन्यमाघार घेतली तर तालिबान अफगाणिस्तानचा पूर्ण ताबा घेईल. असे झाले तर अफगाणी महिलांचे अधिकार पुन्हा पायदळी तुडवले जातील आणि अल कायदासाठी अफगाणिस्तानचे दरवाजे मोकळे होतील’, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

तालिबानने अमेरिकेतील बायडेन प्रशासनाला १ मे पर्यंत सैन्यमाघारीची मुदत दिली आहे. यानंतर अमेरिका व नाटोचे जवान अफगाणिस्तानात दिसले तर घनघोर संघर्ष सुरू होईल, अशी धमकी तालिबानने दिली आहे. तर १ मेपर्यंत सैन्यमाघार शक्य नसल्याचे बायडेन प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी अफगाणिस्तानबाबत दिलेले अहवाल बायडेन प्रशासनासमोरील अडचणी वाढणारे आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गुरुवारी पहिल्यांदा माध्यमांशी बोलताना तालिबानने दिलेल्या मुदतीवर आपली भूमिका स्पष्ट केली. १ मेपर्यंत अफगाणिस्तानातून अमेरिका आणि नाटोचे सैन्यमाघारी घेणे शक्य नसल्याचे बायडेन म्हणाले होते. यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी तांत्रिक कारणे दिली होती. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या घोषणेवर तालिबानकडून प्रतिक्रिया आली आहे.

‘दोहा येथील करारात ठरल्यानुसार, परदेशी जवानांनी वेळीच अफगाणिस्तानातून माघार घेतली नाही तर सदर तैनाती या शांतीकराराचे उल्लंघन मानले जाईल. यासाठी फक्त अमेरिकेलाच जबाबदार धरले जाईल. यापुढे अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी तालिबान जिहाद छेडेल आणि तो अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यापर्यंत सुरूच राहील’, अशी धमकी तालिबानने दिली.

गेले वर्षभर तालिबानने अमेरिकेबरोबरच्या संघर्षबंदीच्या कराराचे पूर्ण पालन केले. म्हणूनच गेल्या वर्षभरात अमेरिकेला जीवितहानी सोसावी लागली नाही. मात्र अमेरिकाच संघर्षबंदीच्या कराराचे उल्लंघन करणार असेल तर त्याच्या परिणामांसाठीही अमेरिकेने तयार रहावे, असे तालिबानने बजावले.

तालिबानने दिलेल्या या धमकीला काही तास उलटत नाही तोच अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने अमेरिकी गुप्तचर यंत्रणा व अधिकार्‍यांच्या हवाल्याने एक बातमी प्रसिद्ध केली. यामध्ये अफगाणिस्तानातून सैन्यमाघार तालिबानला या देशावर पकड मिळविण्यासाठी उपकारक ठरेल, असे सांगण्यात आले आहे. अफगाणिस्तानात लोकनियुक्त आणि तालिबान यांचे आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर, सर्व प्रशासकीय व्यवस्था सुरळीत झाल्यानंतरच अमेरिकेने येथून सैन्यमाघार घ्यावी, असे गुप्तचर यंत्रणांनी सुचविले आहे.

अफगाणिस्तानात आघाडी सरकार स्थापन होण्याआधी अमेरिका आणि नाटोने सैन्यमाघार घेतल्यास पुढील दोन ते तीन वर्षात तालिबान अफगाणिस्तानवर पूर्ण नियंत्रण मिळविल, असा इशारा अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी दिला. त्याचबरोबर तालिबानने अफगाणिस्तानवर पकड जमवली तर अल कायदासाठी या देशाचे दरवाजे पुन्हा मोकळे होतील व ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा अफगाणिस्तानात बळकट होईल, असा धोक्याचा इशारा अमेरिकी अधिकार्‍यांनी दिला आहे.

तर अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या काही माजी अधिकार्‍यांनी याच्या पुढे जाऊन काही धक्कादायक निष्कर्ष नोंदविले आहेत. तालिबान सत्तेवर आल्यास अफगाणिस्तान पुन्हा अंधारयुगात जाईल, या देशातील महिलांचे अधिकार पुन्हा चिरडले जातील. अफगाणिस्तानमधील महिला, मुलींसाठी मिळणारे शिक्षण व आरोग्यसुविधा पुन्हा बंद होतील, असा दावा या अमेरिकी अधिकार्‍यांनी केला आहे.

अफगाणिस्तानचे नेते देखील अमेरिकेच्या सैन्यमाघारीवर अशाच चिंता व्यक्त करीत आहेत. अफगाणिस्तानचे नॅशनल हिरो म्हणून ओळखले जाणारे ‘अहमद शहा मसूद’ यांचा मुलगा अहमद मसूद याने देखील अमेरिकेने सैन्यमाघारीची घाई करू नये, असे सुचविले आहे. घाईघाईने घेतलेली सैन्यमाघार अफगाणिस्तानला पुन्हा गृहयुद्धाच्या खाईत ढकलेल, असा इशारा मसूद यांनी दिला आहे. भारतानेही अमेरिकेला फार आधीच या धोक्यांची जाणीव करून दिली होती.

leave a reply