भारत व चीनने शांतीपूर्ण चर्चेने सीमावाद सोडवावा

- बौद्ध धर्मगुरू व तिबेटी नेते दलाई लामा यांचे आवाहन

शांतीपूर्ण चर्चेनेलेह – लष्करी बळाचा वापर करण्याचे धोरण आता कालबाह्य झालेले आहे. हे लक्षात घेऊन भारत व चीन या शेजारी देशांनी आपला सीमावाद शांतीपूर्ण चर्चेने सोडवावा, असे आवाहन बौद्धधर्मगुरू व तिबेटी नेते दलाई लामा यांनी केले. सध्या लेह-लडाखच्या भेटीवर असलेल्या लामा यांनी केलेले हे आवाहन चीनला झोंबणारे ठरू शकते. काही दिवसांपूर्वीच, वाढदिवसानिमित्त भारताच्या पंतप्रधानांनी आदरणीय दलाई लामा यांना फोनवरून दिलेल्या शुभेच्छांवरही चीनने आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे त्यांची लेह-लडाख भेट आणि शांतीपूर्ण वाटाघाटींचे आवाहन देखील चीनला अस्वस्थ करणारे ठरू शकते.

17 जुलै रोजी लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक पार पडेल. दोन्ही देशांच्या लष्करामधील ही चर्चेची 16 फेरी आहे. आधीच्या चर्चेच्या फेऱ्यातून फारसे काही निष्पन्न झालेले नसताना, यावेळच्या चर्चेतून फारसे काही हाती लागण्याची शक्यता नाही. भारताच्या मागणीनुसार चीनचे लष्कर एलएसीजवळील क्षेत्रातून माघार घ्यायला तयार नाही. जोवर चीनचे लष्कर इथून माघार घेऊन लडाखच्या एलएसीवर यथास्थिती प्रस्थापित करणार नाही, तोवर दोन्ही देशांचे संबंध सुधारणे शक्य नाही, याची जाणीव भारत चीनला करून देत आहे.

याबरोबरच चीनला लष्करी बळाचा वापर करून एलएसीवरील परिस्थिती चीनला बदलता येणार नाही, हे भारताकडून सातत्याने बजावण्यात येत आहे. भारताचे संरक्षणमंत्री व परराष्ट्रमंत्री चीनला यावरून सज्जड इशारे देत आहेत. गेल्या आठवड्यात इंडोनेशियामध्ये पार पडलेल्या जी-20च्या बैठकीतही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांना लडाखच्या एलएसीवरून चीनने लष्कर मागे घेतल्याखेरीज दोन्ही देशांचे संबंध सुधारणार नाहीत, असे बजावले होते. या पार्श्वभूमीवर, दलाई लामा यांनी भारत व चीनला लष्करी बळाचा वापर करण्याचे धोरण आता कालबाह्य झाल्याचे सांगून वाटाघाटींनी सीमावाद सोडविण्याचा सल्ला दिला आहे.

त्यांचा हा सल्ला दोन्ही देशांना उद्देशून असला, तरी चीन त्यावर आक्षेपघेऊ शकतो. दलाई लामा यांचा वापर करून भारत तिबेटचा मुद्दा उकरून काढत असल्याची टीका चीन करीत आहे. चीनपासून तिबेटला स्वतंत्र करू पाहणाऱ्या फुटीर चळवळीचे नेते म्हणून चीन दलाई लामा यांच्याकडे कायम संशयने पाहत आला आहे. पण आपण तिबेटच्या स्वातंत्र्याची नाही तर, अर्थपूर्ण स्वायत्तेची मागणी करीत आहोत, असे सांगून दलाई लामा यांनी आपल्या लेह भेटीत चीनच्या आरोपांना उत्तर दिले. तिबेटी बौद्धधर्माच्या संस्कृतिचे संवर्धन करण्याची हमी चीनने द्यावी, इतकीच आपली मागणी असल्याचे दलाई लामा यांनी म्हटले आहे.

leave a reply