लडाखच्या एलएसीवर भारत-चीन चर्चेची ११ वी फेरी

नवी दिल्ली/बीजिंग – लडाखच्या एलएसीवर भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चर्चेची ११वी फेरी शुक्रवारपासून सुरू होत आहे. इथली सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू झालेली असली तरी पूर्ण झालेली नाही, याकडे भारत लक्ष वेधत आहे. यामुळेच लडाखच्या एलएसीवरील धोका टळलेला असला, तरी संपलेला नाही, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी बजावले होते. इथे २०२० सालच्या एप्रिल महिन्यात होती, तशीच स्थिती पुन्हा प्रस्थापित व्हावी, अशी भारताची प्रमुख मागणी आहे. यावर विचार करता येईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

एलएसीवरील पँगॉंग सरोवर क्षेत्रातून चीनच्या लष्कराने माघार घेतली. पण अजूनही गोग्रा, हॉट स्प्रिंग आणि डेप्सांग इथे चीनचे लष्कर तैनात आहे. या ठिकाणाहून देखील चीनच्या लष्कराने माघार?घ्यावी आणि लडाखच्या एलएसीवर २०२० सालच्या एप्रिल महिन्यासारखी स्थिती प्रस्थापित व्हावी, अशी भारताची मागणी आहे. शुक्रवारपासून सुरू होणार्‍या लष्करी अधिकार्‍यांच्या चर्चेत भारताकडून ही मागणी ठामपणे मांडली जाईल. याआधीच्या चर्चेतही भारताने परखडपणे ही बाब मांडली होती. त्याचवेळी एलएसीवर हजारो जवानांची तैनाती करून दोन्ही देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित होण्याची अपेक्षा ठेवता येणार नाही, असे भारताच्या नेत्यांनी चीनला बजावले होते.

चीनने काही काळासाठी पँगॉंग सरोवर क्षेत्रातून माघार घेतली असली तरी कुठल्याही क्षणी या देशाचे लष्कर एलएसीवर घुसखोरीचा नवा प्रयत्न करू शकेल, असे इशारे विश्‍लेषकांकडून दिले जात आहेत. गेल्या वर्षी ५ मे रोजी गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षाचा दाखला देऊन माजी लष्करी अधिकारी देखील चीनवर विश्‍वास ठेवता येणार नाही, हे सातत्याने बजावत आहेत. अशा परिस्थितीत भारत चीनच्या प्रत्येक हालचालींकडे अत्यंत बारकाईने पाहत आहे. गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर चीनने ५० हजाराहून अधिक जवान, रणगाडे व लष्करी वाहने लडाखच्या एलएसीवर तैनात करून भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता. पण तितकीच तैनाती करून भारताने चीनला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.

भारतावर दडपण टाकण्याचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर, चीनने पँगॉंग सरोवर क्षेत्रातून माघार घेतली. पण अजूनही चीन भारतावर दडपण टाकण्याचे प्रयत्न सोडून द्यायला तयार नाही. म्हणूनच गोग्रा, हॉट स्प्रिंग आणि डेप्सांग या क्षेत्राजवळ चीनचे जवान अजूनही तैनात आहेत. वाटाघाटीत याचा वापर करण्याची चीनचा डाव असण्याचीही शक्यता यामुळे समोर येत आहे. म्हणूनच एप्रिल २०२० सारखी स्थिती एलएसीवर प्रस्थापित व्हावी, या भारताने केलेल्या मागणीवर विचार करता येईल, असे दावे चीनने केले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दोन्ही देशांमधला तणाव कमी करण्यासाठी चीनची संपूर्ण सैन्यमाघार ही पूर्वअट असल्याचे भारताने याआधी वारंवार बजावले होते. याला चीनने नकार दिला, तर लडाखच्या एलएसीवर तणाव वाढू शकतो. या क्षेत्रातील क्षेपणास्त्रसज्ज रफायल विमानांची उड्डाणे चीनला हाच इशारा देत आहेत.

leave a reply