सॉलोमन आयलंडवरील चीनचा लष्करी तळ खपवून घेणार नाही

- अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारा

सिडनी/वॉशिंग्टन – चीन आणि सॉलोमन आयलंड यांच्यात झालेल्या सुरक्षाविषयक करारावर अमेरिकेने संताप व्यक्त केला. ‘चीनचे सॉलोमन आयलंडमध्ये लष्करी तळ अमेरिका अजिबात खपवून घेणार नाही. असे झाले तर सॉलोमन आयलंडवरील चीनच्या लष्करी तळाला योग्य ते उत्तर मिळेल’, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिला. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील सॉलोमन आयलंडने चीनशी व्यवहार करताना सावधपणा बाळगावा, असे आवाहन केले आहे.

व्हाईट हाऊसच्या इंडो-पॅसिफिक विभागाचे समन्वयक कर्ट कॅम्पबेल यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या शिष्टमंडळासह सॉलोमन आयलंड आणि शेजारी देशांचा दौरा केला. यावेळी कॅम्पबेल यांनी राजधानी होनिआरा येथे सॉलोमन आयलंडचे पंतप्रधान मनासेह सोगावारे यांची भेट घेतली. या भेटीत सॉलोमन आयलंडने चीनबरोबर केलेल्या सुरक्षा करारावर कॅम्पबेल यांनी टीका केल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले. या भेटीनंतर कॅम्पबेल यांनी माध्यमांशी बोलताना चीनच्या लष्करी तळावरुन इशारा दिला.

‘सुरक्षा कराराच्या आड चीनने सॉलोमन आयलंडवर लष्करी तळ उभारण्यासाठी पावले उचलली, आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन केले किंवा लष्करी हालचाली केल्या, तर त्याला अमेरिकेकडून योग्य ते उत्तर मिळेल’, असे कॅम्पबेल यांनी बजावले. अमेरिका या क्षेत्रातील आपल्या सहकारी देशांच्या सहाय्याने चीनच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून असल्याची माहिती कॅम्पबेल यांनी दिली.

चीनला हा इशारा देत असताना अमेरिकेच्या नेत्यांनी सॉलोमन आयलंडसाठी काही विशेष सहकार्याची घोषणा केली. लवकरच सॉलोमन आयलंडमधील पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेकडून सहाय्य पुरविले जाईल, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले. तर सॉलोमनचे पंतप्रधान सोगावारे यांनी चीनबरोबर झालेल्या सुरक्षा कराराबाबत माहिती दिली. यानुसार चीन सॉलोमन आयलंडमध्ये दीर्घकाळासाठी तळ ठोकणार नाही, किंवा लष्करी तळही उभारणार नसल्याचे पंतप्रधान सोगावारे यांनी कॅम्पबेल यांच्याबरोबर झालेल्या भेटीत स्पष्ट केले. या कराराचा सॉलोमन आयलंड तसेच इतर शेजारी देशांच्या सुरक्षेवर परिणाम होणार नसल्याचा दावा पंतप्रधान सोगावारे यांनी केला.

पण सॉलोमन आयलंडने दिलेल्या या खुलासावर अमेरिका विश्वास ठेवायला तयार नाही. सुरक्षा करार करून चीन सॉलोमन आयलंडमध्ये दीर्घकाळासाठी लष्करी तळ उभारू पाहत असल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. अमेरिकेप्रमाणे ऑस्ट्रेलियाने देखील चीन व सॉलोमन आयलंडमधील या करारावर आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षात चीन ‘इंडोपॅसिफिक’सह संपूर्ण पॅसिफिक महासागरात आपला प्रभाव वाढविण्यासाठी जोरदार हालचाली करीत आहे. त्यासाठी चीनने आपल्या आर्थिक बळाचा वापर सुरू केला होता. पॅसिफिक क्षेत्रातील आठ ‘आयलंड नेशन्स’ना जवळपास दोन अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य व कर्ज दिल्याचे विविध अहवालांमधून समोर आले होते. चीनने सॉलोमन आयलंडबरोबर केलेला करार देखील या सहकार्याचा भाग असल्याचा दावा केला जातो.

बायडेन यांचे प्रशासनाच्या कार्यकाळात चीनने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हालचालींची तीव्रता वाढविली आहे. त्यामुळे सॉलोमन आयलंडबाबत बायडेन प्रशासनाकडून दिल्या जात असलेल्या इशाऱ्यांचा विशेष परिणाम चीनच्या हालचालींवर होण्याची फारशी शक्यता नाही.

leave a reply