भारत-फ्रान्स-युएईची धोरणात्मक भागीदारीवर चर्चा

न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेसाठी परराष्ट्रमंत्री जयशंकर अमेरिकेत दाखल झाले आहेत. आमसभेच्या पार्श्वभूमीवर, भारत-फ्रान्स आणि युएईची त्रिपक्षीय चर्चा संपन्न झाली. ही चर्चा फलदायी ठरल्याची माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सोशल मीडियावर दिली. याबरोबरच इजिप्त, इथिओपिया, अल्बानिया, सर्बिया, क्युबा आणि त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही जयशंकर यांची चर्चा पार पडली. युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर, विश्वासार्ह गतीने प्रगती करणारी जगातील एकमेव प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारत आंतरराष्ट्रीय पटलावर उदयाला येत आहे. अशा काळात संयुक्त राष्ट्रसंघाची ही आमसभा भारताचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरते आहे. परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीगाठी व चर्चेमध्ये याचे प्रतिबिंब उमटल्याचे दिसते आहे.

strategic partnershipआमसभेसाठी परराष्ट्रमंत्री जयशंकर दहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्री कॅथरिन कॉलोना, युएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायद अल-नह्यान यांच्याछी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची त्रिपक्षीय चर्चा पार पडली. सोमवारी पार पडलेल्या या चर्चेत धोरणात्मक भागीदारीवर विचारविनिमय झाला. आत्ताच्या काळात राजनैतिक स्तरावर फार मोठे बदल होत आहेत. काही देश भौगोलिकदृष्ट्या एकमेकांचे शेजारी नाहीत. तरीही त्यांचे समान हितसंबंध आणि एकमेकांबरोबर सहकार्य करण्याची इच्छा प्रबळ बनलेली आहे. ही बाब केंद्रस्थानी ठेवून भारत-फ्रान्स-युएई यांच्यामध्ये ही त्रिपक्षीय चर्चा पार पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तिन्ही देशांमधील समान सूत्रांवर यात चर्चा झाल्याचेही अधिकारी पुढे म्हणाले.

ही त्रिपक्षीय चर्चा फलदायी ठरल्याची माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सोशल मीडियावर दिली. आपले हितसंबंध जपण्यासाठी जगात वेगवेगळे गट, आघाड्या तयार होत आहे. भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेली ‘क्वाड’, भारत-इस्रायल-अमेरिका व युएईचा समावेश असलेली ‘आय2यू2’ आणि भारत-फ्रान्स-ऑस्ट्रेलियाचे त्रिपक्षीय सहकार्य यांचा दाखला देऊन अधिकाऱ्यांनी भारताच्या फ्रान्स व युएईबरोबरील सहकार्याचे महत्त्व स्पष्ट केले. विशेषतः युएईबरोबरील भारताचे सहकार्य वेगवेगळ्या आघाड्यांवर अधिक प्रभावी ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

इजिप्त, इथिओपिया, अल्बानिया, सर्बिया, क्युबा आणि त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही जयशंकर यांची द्विपक्षीय चर्चा पार पडली. सर्बियाचे परराष्ट्रंत्री निकोला सेलाकोविच यांचे स्वागत करताना जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची आमसभा मित्रांनी भरून गेल्याचे विधान केले. तर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग इजिप्तच्याच दौऱ्यावर असताना, जयशंकर यांची इजिप्तचे परराष्ट्रमंत्री सामेह शौक्री यांच्याशी चर्चा झाली. संरक्षण, व्यापार आणि गुंतवणुकीच्या आघाडीवर भारत व इजिप्तचे द्विपक्षीय सहकार्य अधिकाधिक भक्कम होत असल्याचे जयशंकर म्हणाले.

याबरोबरच ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया तसेच शिक्षण क्षेत्रातील भारताची इजिप्तबरोबरील भागीदारी विकसित होत असल्याचे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी त्यावर समाधान व्यक्त केले आहे.

leave a reply