उत्तर कोरियाच्या अणुहल्ल्याला जबरदस्त आणि निर्णायक उत्तर मिळेल

- अमेरिका-दक्षिण कोरियाचा इशारा

सेऊल – देशाच्या आण्विक धोरणात बदल करून शत्रू देशावर अणुहल्ला चढविण्याची धमकी उत्तर कोरियाने दिली होती. हुकूमशहा किम जाँग-उन यांच्याविरोधात कारस्थान केले तरीही अणुहल्ला चढविला जाईल, असे उत्तर कोरियाने धमकावले होते. या पार्श्वभूमीवर, अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये उत्तर कोरियाच्या अणुहल्ल्याला जबरदस्त आणि निर्णायक उत्तर मिळेल, असा इशारा अमेरिका व दक्षिण कोरियाने दिला. अमेरिकेची अजस्त्र विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रोनाल्ड रिगन’ येत्या काही दिवसात युद्धसरावासाठी दक्षिण कोरियात दाखल होणार आहे. त्याच्या आधी अणुहल्ल्याबाबत दोन्ही बाजूंनी दिले जाणारे हे इशारे या क्षेत्रातील वातावरण तापवत आहेत.

uss reagan in route to busanअमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र तसेच संरक्षण विभागांच्या उपमंत्र्यांची वॉशिंग्टनमध्ये ‘एक्स्टेंडेड डिटरन्स स्ट्रॅटजी ॲण्ड कन्सल्टेशन ग्रूप-इडीएससीजी’ विशेष बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उत्तर कोरियाने दिलेल्या धमकीवर चर्चा झाली. उत्तर कोरियाच्या होऊ घातलेल्या अणुचाचणीला देखील अमेरिका आणि दक्षिण कोरियाकडून प्रत्युत्तर मिळेल, असे संयुक्त निवेदनात प्रसिद्ध करण्यात आले. त्याचबरोबर उभय देशांमधील लष्करी सरावाची तीव्रता वाढविण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

अमेरिका आणि दक्षिण कोरियातील या युद्धसरावात सहभागी होण्याकरीता ‘युएसएस रोनाल्ड रिगन’ ही विमानवाहू युद्धनौका बुसान बंदरासाठी रवाना झाली आहे. येत्या शुक्रवारी अमेरिकेची युद्धनौका आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह दक्षिण कोरियात दाखल होईल. यामध्ये क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या विनाशिका तसेच पाणबुडीचा समावेश आहे. 2018 सालानंतर पहिल्यांदाच अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका दक्षिण कोरियात दाखल होणार आहे.

दरम्यान, विमानवाहू युद्धनौकेच्या या तैनातीसह अमेरिकेने उत्तर कोरिया तसेच चीनला इशारा दिल्याचा दावा केला जातो. या युद्धसरावाद्वारे अमेरिका व दक्षिण कोरिया आपल्या देशावर हल्ल्याची तयारी करीत असल्याचा आरोप उत्तर कोरियाने याआधी केला होता. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना हा सराव पार पडणार आहे.

चीनचे नौदल तैवानची कोंडी करील
अमेरिकेच्या वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याचा इशारा

वॉशिंग्टन – गेल्या काही वर्षांमध्ये चीनने आपल्या नौदलाच्या सामर्थ्यात वाढ केली आहे. चीनचे हे नौदल गरज पडली तर वेढा घालून तैवानची कोंडी करील, असा इशारा अमेरिकन नौदलाच्या सेवन्थ फ्लिटचे कमांडर वाईस ॲडमिरल कार्ल थॉमस यांनी दिला. असे झाले तर तैवानची कोंडी फोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र यावे लागेल, असे आवाहन थॉमस यांनी अमेरिकी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीतून केले.

महिन्याभरापूर्वी अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनने या क्षेत्रातील आपला युद्धसराव वाढविला आहे. गेल्या महिन्याभरात तैवानच्या सभोवती विनाशिका, युद्धनौका आणि ॲम्फिबियस जहाजांची तैनाती वाढवून चीनने आपण तैवानची कोंडी करू शकतो हे दाखवून दिले आहे, याकडे थॉमस यांनी लक्ष वेधले.

‘चीनच्या मँड्रियन भाषेत ‘कान शी’ अर्थात रेशीमच्या किड्याप्रमाणे सतत कुरतडत राहण्याची संकल्पना मांडली जाते. यानुसार चीन हळुहळू तैवानजवळील आपल्या कारवाया वाढवित राहील’, असा दावा वाईस ॲडमिरल थॉमस यांनी केला. चीनने साऊथ चायना सीचे पूर्णपणे लष्करीकरण केले असून त्याचा वापर तैवानची कोंडी करण्यासाठी होऊ शकतो, याची जाणीव थॉमस यांनी करुन दिली.

 

 

leave a reply