भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाचे इम्रान खान यांना सणसणीत प्रत्युत्तर

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसची साथ आल्यानंतर ८४% भारतीय जनतेवर उपासमारीचे संकट ओढावले आहे, यातील ३४% भारतीय जेमतेम आठवड्याभराच्या कालावधीपर्यंत तग धरू शकतील, असे दावे करून त्यावर हळहळ व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पाकिस्तानने आपल्या गरीब जनतेसाठी लागू केलेल्या योजनांचा अनुभव आमच्या गाठीशी आहे. या अनुभवाचा वापर आम्ही भारतासाठी करु शकतो, असे इम्रान खान यांनी मोठे औदार्य सोशल मीडियावर दाखविले आहे. त्याची भारतीयांकडून खिल्ली उडविली जात आहे. तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी जीडीपीच्या ९० टक्क्यांपर्यंत कर्जात बुडालेल्या पाकिस्तानने आधी आपल्या देशाची चिंता करावी असे बजावले आहे. तसेच पाकिस्तानच्या एकूण जीडीपीपेक्षा मोठ्या रक्कमेचे पॅकेज भारत सरकारने आपल्या जनतेला दिले आहे, याची आठवण श्रीवास्तव यांनी पाकिस्तानला करून दिली.

India-Imran khanअमेरिकेतल्या काही विद्यापीठांनी केलेल्या पाहणी अहवालात कोरोनाव्हायरसची साथ आल्यानंतर सुमारे ८४% इतक्या भारतीयांवर आर्थिक संकट कोसळल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या वर्तमानपत्राने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीचा दाखला देऊन पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला मदतीचा प्रस्ताव दिला. यावर भारतीयांची प्रतिक्रिया उमटली. भीकेकंगाल बनलेला पाकिस्तान भारतासारख्या देशाला मदतीचा प्रस्ताव देत आहे, ही सर्वात मोठी हास्यास्पद बाब ठरते, अशा शब्दात नेटकरांनी इम्रान खान यांची खिल्ली उडविली.

आपण केलेले दोषारोप आणि कांगावा याकडे भारताचे सरकार लक्ष देत नाही. यामुळे अस्वस्थ झालेल्या इम्रान खान यांनी मदतीचा हा प्रस्ताव ठेवला असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. निदान यामुळे तरी आपल्याला भारत सरकारकडून थोडी फार किंमत मिळेल, या आशेने इम्रान खान यांनी हा प्रयत्न करुन पाहिल्याचा शेरा विश्लेषकांनी मारला आहे. अन्यथा कोरोनाव्हायरसच्या साथीचा पाकिस्तानात विस्फोट होत असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व इतर देशांकडे भीक मागणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी प्रस्ताव देऊन आपले हसे करुन घेतले नसते.

भारताच्या परराष्ट्रमंत्रालयानेही इम्रान खान यांनी केलेल्या या विधानांचा समाचार घेतला. पाकिस्तानला आपल्या जनतेसाठी करण्यासारखे बरेच काही आहे. या देशावर त्यांच्या जीडीपीच्या तुलनेत ९०% इतके कर्ज आहे. तर भारत सरकारने आपल्या जनतेसाठी पाकिस्तानच्या एकूण जीडीपी पेक्षाही अधिक रक्कमेचे पॅकेज उपलब्ध करुन दिले आहे, अशा शब्दात परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी इम्रान खान यांना फटकारले आहे. पाकिस्तानात टोळधाडीने सुमारे दोन कोटी ३० लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावरील पीक फस्त करून टाकले आहे. भारतातही टोळधाडीची समस्या असली तरी भारताने त्याचा यशस्वीरीत्या सामना केल्याचे दिसत आहे. टोळधाडीची समस्या सोडविण्यासाठी भारताने पाकिस्तानला सहाय देऊ केले होते. मात्र अद्याप त्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया आलेली नाही. याकडे भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने लक्ष वेधले.

या गोष्टीवर बोट ठेवून पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला दिलेल्या मदतीचा प्रस्ताव म्हणजेच बनाव असल्याचे परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दाखवून दिले आहे. कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना पाकिस्तानची माध्यमे व भारतद्वेषी पत्रकार आणि विश्लेषक या साथीमुळे भारताची अवस्था दयनीय बनल्याचे सांगून यावर आनंद व्यक्त करीत होते. यामुळे भारताची अर्थव्यवस्था रसातळाला जाईल, असे दावे ठोकून याकडून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भारताचे सरकार पाकिस्तान द्वेषाचा वापर करीत असल्याचे या मंडळीचे म्हणणे होते. पण आता पाकिस्तान कोरोनाची साथ भयंकर स्वरूप धारण करीत असून एकट्या लाहोरमध्येच याचे साडेसहा लाखांहून अधिक रुग्ण असतील, अशी चिंता व्यक्त करणारा अहवाल प्रसिद्ध झाला. पण हा अहवाल मे महिन्यातला हा असून आता लाहोरमध्ये ११ लाखांहून अधिक कोरोनाचे रुण असल्याचा दावा एका पत्रकाराने केला आहे.

पाकिस्तानच्या या अवस्थेला इम्रान खान यांनी त्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा ठपका या पत्रकाराने ठेवला आहे. अशा परिस्थितीत भारताला मदतीचा प्रस्ताव देऊन आपले हसे करुन देणाऱ्या इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानात अधिक सडकून टीका होईल, असे संकेत मिळत आहेत.

leave a reply