कोरोनाच्या जागतिक क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर; देशातील कोरोनाच्या बळींची संख्या ७१ हजारांवर

नवी दिल्ली – देशातील कोरोनामुळे बळी गेलेल्या रुग्णांची संख्या ७१ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच आतापर्यंत नोंद झालेल्या रुग्णांची संख्या ४१ लाख ६० हजारांवर गेली आहे. यामुळे कोरोनाचे सर्वाधिक नोंद झालेल्या देशांमध्ये भारताने ब्राझिललाही मागे टाकले आहे. शुक्रवारपासून शनिवाराच्या सकाळपर्यंत देशात तब्बल ९० हजार नवे रुग्ण आढळले होते, तर शनिवार रात्रीपर्यंत सुमारे तितक्याच नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे राज्यांकडून प्रसिद्ध माहितीवरून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातच चोवीस तासात ३२८ जणांचा बळी गेला असून २३,३५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

जागतिक क्रमवारीत

भारतात दरदिवशी कोरोनाचे विक्रमी नवे रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत जगात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेल्या अमेरिकेतही सध्या ४० ते ५० हजार नवे रुग्ण आढळत आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ६४ लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जगात आतापर्यंत एका दिवसात कोरोनाचे ७५ हजार पेक्षा नवे रुग्ण भारत सोडून कोणत्याही देशात आढळलेले नाहीत. सध्या भारतात दरदिवशी सुमारे ९० हजार नव्या रुग्णांची नोंद होऊ लागली असून यामुळे चिंता वाढल्या आहेत.

भारतात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या होत आहेत. त्यामुळे आढळत असलेल्या नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बरेहोणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ७७.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. शुक्रवारपासून शनिवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ७३,६४२ रूग्ण बरे होवून परतले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी ७० हजारपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत. देशामध्ये आतापर्यंत कोरोनाचे जवळपास ३१ लाख ८० हजार ८६५ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.

leave a reply