दहशतवादाविरोधातील जागतिक लढ्यात भारत सर्वात आघाडीवर

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

जिनिव्हा – ‘मानवतेला सर्वात धोका हा दहशतवादाचा आहे. त्यामुळे दहशतवादाला कधीचे योग्य ठरवता येणार नाही. तसेच दहशतवादाला पोसणार्‍यांची तुलना दहशतवादाच्या बळींशी करता येणार नाही’, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बजावले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेच्या ४६ व्या सत्राला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व्हर्च्युअली संबोधित केले. यावेळी स्वत: दहशतवादाचे बळी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानवर परराष्ट्रमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या जोरदार टीका केली. ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टाक्स फोर्स’ची (एफएटीएफ) बैठक सध्या सुरू असून या बैठकीत पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये राहणार की काळ्या यादीत जाणार याचा निर्णय होणार आहे. पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी धडपड आहे. या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत.

‘भारत कित्येक वर्ष दहशतवादाचा बळी ठरला आहे. त्यामुळेच दहशतवादाविरोधात जागतिक लढ्यात भारत सर्वात आघाडीवर आहे. म्हणूनच मानवतेला दहशतवादा इतका धोका कोणापासून नाही, हे भारत ठामपणे सांगू शकतो. दहशतवाद हा मानवतेविरोधातील गुन्हा असून यामुळे मानवाधिकाराचे सर्वात मोठे उल्लंघन होत आहे’, असेे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केले. मात्र मानवतेच्या विरोधातील या सर्वात मोठ्या शत्रूविरोधात लढा तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा मानवाधिकारासाठी लढणार्‍या संघटनांसह सर्व जणांना दहशतवादाला कोणत्याही प्रकारे योग्य ठरवता येणार नाही याची जाणीव होईल, असे जयशंकर यांनी अधोरेखित केले.

दहशतवादाला पोसणारे आपणच दहशतवादाचे बळी आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करतात. मात्र दहशतवादाला पोसणार्‍यांची तुलना दहशतवादाच्या पिडीताशी करताच येणार नाही, असे परराष्ट्रमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानला लक्ष्य केले. पाकिस्तान सातत्याने आपणच दहशतवादाचे बळी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. एकाबाजूला दहशतवाद पोसणार्‍या, त्याला खतपाणी घालणार्‍या, दुसर्‍या बाजूला स्वत:ला दहशतवादाचे बळी ठरविण्याच्या पाकिस्तानच्या या प्रयत्नांवरच जयशंकर यांनी ताशेरे ओढले. याद्वारे त्यांनी जागतिक समुदायाला दहशतवादाच्या बाबतीत अधिक कठोर भूमीका स्विकारायला हवी, असा संदेश दिला.

भारताने गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षापरिषदेत दहशतवादाशी सामना करण्यासाठी आठ सूत्री कार्यक्रमाचा प्रस्ताव ठेवला होता. भारत हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यासाठी सुरक्षा परिषदेबरोबर इतर देशांबरोबर काम करणार आहे, असेही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टाक्स फोर्स’ची (एफएटीएफ) बैठक सुरू आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार्‍या या बैठकीत पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये राहणार, त्यातून बाहेर पडणार का काळ्या यादीत जाणार यावर निर्णय होणार आहेत. नुकतेच पाकिस्तानच्या लष्कराने आपण गेल्या चार वर्षात ३ लाख ७५ हजार दहशतवादविरोधी मोहिमा राबवून कित्येक टेरर नेटवर्क उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. पाकिस्तानचे हे दावे एफएटीएफच्या कारवाईपासून स्वत:ला वाचविण्यासाठी करण्यात येत आहेत हे उघड आहे. अशावेळी संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. तसेच पाकिस्तानचा दरवेळी बचाव करणार्‍या चीन, तुर्कीसारख्या देशांनाही याद्वारे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्ष्य केल्याचे स्पष्ट दिसते.

leave a reply