भारत चीनच्या विरोधात अमेरिकेशी सहकार्य करणार नाही

- ग्लोबल टाईम्सचा विश्‍वास

बीजिंग – लडाखच्या एलएसीवर भारतीय सैन्याने चीनच्या लष्कराला धक्का दिल्यानंतर, भारत अमेरिकेच्या बळावर या कारवाया करीत असल्याचे आरोप चीनने लगावले होते. तसेच भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाचे स्वातंत्र्य गमावून चीनच्या विरोधात अमेरिकेशी सहकार्य सुरू केल्याचा आरडाओरडा चीनची सरकारी माध्यमे करीत होती. पण आता मात्र भारत आपल्या परराष्ट्र धोरणाचे स्वातंत्र्य गमावून अमेरिकेशी सहकार्य करणार नाही, असा विश्‍वास चीनला वाटू लागला आहे. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने तसा दावा केला आहे.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन भारताच्या भेटीवर आले होते. त्याआधी त्यांनी जपान, दक्षिण कोरिया या देशांना भेट दिली. चीनचा वाढता प्रभाव डोळ्यासमोर ठेवून अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी या देशांना भेट दिल्याचा दावा ग्लोबल टाईम्सने केला. पण जपान व दक्षिण कोरियाप्रमाणे भारत मात्र अमेरिकेच्या चीनविरोधी आघाडीत सहभागी होण्याची शक्यता नाही, असा निर्वाळा ग्लोबल टाईम्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आपल्या वृत्तात दिला. त्यासाठी या वर्तमानपत्राने भारतीय अभ्यासकांचा हवाला दिला आहे. अमेरिकी संरक्षणमंत्र्यांच्या जपान दौर्‍यात चीनपासून असलेल्या धोक्याचा थेट उल्लेख करण्यात आला होता. पण संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्या भारतभेटीत चीनचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही, याकडे ग्लोबल टाईम्सने लक्ष वेधले.

याचा अर्थ भारत अमेरिकेच्या चीनविरोधी आघाडीत सहभागी होणार नाही असा होते, असे ग्लोबल टाईम्सचे म्हणणे आहे. भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र असून जपानप्रमाणे भारताला आपल्या बाजूने वळविणे अमेरिकेला शक्य होणार नाही, असे सांगून ग्लोबल टाईम्सने वेगळ्या शब्दात भारताची प्रशंसा केली. लवकरच भारत, रशिया, चीन, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या ‘ब्रिक्स’ संघटनेचे आयोजन भारतात केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी भारताला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारताने अमेरिकन संरक्षणमंत्र्यांच्या दौर्‍यात चीनचा नामोल्लेख करून विरोधात भूमिका घेण्याचे टाळल्याचे भारतीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्याला ग्लोबल टाईम्सने दुजोरा दिला.

काही आठवडे आधी, ग्लोबल टाईम्सने भारत आपल्या परराष्ट्र धोरणाचे स्वातंत्र्य गमावत असल्याची जोरदार टीका केली होती. पण आता अचानक चीनच्या या सरकारी मुखपत्राला भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अतिशय आदर व विश्‍वास वाटू लागला आहे. याचे कारण क्वाडच्या नेत्यांच्या बैठकीनंतर, चीन राजनैतिक डावपेचांचा वापर करून या संघटनेपासून भारताला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ब्रिक्सचे आयोजन भारतात करण्याला चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेला पाठिंबा हा याच धुर्त योजनेचा भाग ठरतो. त्याचवेळी लडाखच्या एलएसीवरून निर्माण झालेल्या तणावाचा फार मोठा फटका चीनला बसला असून पुढच्या काळात भारताच्या विरोधात टोकाची भूमिका घेतील, तर त्याचे आर्थिक दणके आपल्याला बसतील, याची जाणीव चीनला झालेली आहे. म्हणूनच चीन आता कूटनीतिचा वापर करीत असल्याचे ग्लोबल टाईम्सच्या दाव्यातून उघड होत आहे.

leave a reply