भारताचे आण्विक धोरण चीनकेंद्री बनले आहे

- अमेरिकी जर्नलचा दावा

America-Journalशिकागो – गेली कित्येक दशके भारताचे आण्विक धोरण पाकिस्तानकेंद्री होते. पण २०१७ सालच्या डोकलामच्या वादानंतर भारताचे हेच आण्विक धोरण चीनकेंद्री बनले आहे. चीनची राजधानी बीजिंग भारताच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात असून आता चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताची बारीक नजर आहे. अमेरिकास्थित ‘बुलेटीन ऑफ द अटोमिक सायंटिस्ट’ या गटाने आपल्या जर्नलमध्ये ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

दुसर्‍या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर १९४५ साली अमेरिकेतील संशोधिकांनी ‘बुलेटीन ऑफ द ऍटोमिक सायंटिस्ट’ संघटना स्थापन केली. गेली कित्येक दशके सदर संघटना आपल्या जर्नल तसेच संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरातील देशांकडून केल्या जाणार्‍या आण्विक हालचालींवर माहिती देत आहे. ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट’ या अमेरिकी अभ्यासगटातील ‘न्युक्लिअर इन्फोर्मेशन प्रोजेक्ट’चे संचालक असलेले हॅन्स एम. क्रिस्टन्सन आणि त्यांचे सहाय्यक मॅट कोर्डा यांनी दोन दिवसांपूर्वी सदर अमेरिकी जर्नलमध्ये भारताच्या आण्विक धोरणात झालेल्या बदलांबाबत सांगितले.

गेल्या काही वर्षांपूर्वी पर्यंत भारताचे पारंपरिक आण्विक धोरण हे पूर्णपणे पाकिस्तानकेंद्री होते. अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या या दोन्ही शेजारी देशांमधील तणाव हा नेहमीच जागतिक सुरक्षेसाठी चिंतेचा वि़षय ठरला होता, याची आठवण अमेरिकी जर्नलने करुन दिली. मात्र २०१७ साली चीनबरोबर पेटलेल्या डोकलामच्या वादानंतर भारताला आपल्या पारंपरिक आण्विक धोरणात बदल करावा लागला. भारताच्या तुलनेत चीनकडे असलेली आण्विक क्षमता, यामुळे भारताचे आण्विक धोरण अधिकाधिक चीनकेंद्री बनले, याकडे या क्रिस्टन्सन आणि कोर्डा यांनी लक्ष वेधले. भारताच्या चीनकेंद्री आण्विक धोरणाबाबत सांगत असताना, क्रिस्टन्सन आणि कोर्डा यांनी भारताच्या आण्विक क्षमतेची माहिती दिली.

America-Journalया धोरणाचा महत्त्वाचा भाग म्हणून भारताने आपल्या अण्वस्त्रांच्या अत्याधुनिकीकरणाला महत्त्व दिल्याचा दावा या अभ्यासकांनी केला. यामध्ये भारताच्या ‘अग्नी ५’ या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्राची दखल यात घेण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ‘अग्नी १’, ‘अग्नी २’, ‘अग्नी ३’, ‘अग्नी ४’ आणि ‘पृथ्वी २’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांचा उल्लेख यात करण्यात आला आहे. यापैकी ‘अग्नी ४’ व ‘अग्नी ५’ क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात चीनची बीजिंग आणि शंघाय पर्यंत मारा करू शकतात, असे क्रिस्टन्सन आणि कोर्डा यांनी लिहिले आहे. तर, भारत मोबाईल लॉंचर्स, लढाऊ विमाने आणि पाणबुडीतून अण्वस्त्रे प्रक्षेपित करण्याचे तंत्रज्ञान विकसित करीत असून या सर्व यंत्रणा तैनातीसाठी तयार असतील, असे यात म्हटले आहे. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात असलेली ‘मिराज २०००एच’ आणि ‘जॅग्वार आयएस’ ही दोन्ही लढाऊ विमाने तसेच पुढच्या आठवड्यात भारतात दाखल होणारी रफायल विमाने अण्वस्त्रांनी सज्ज होऊ शकतात, याकडे या जर्नलने लक्ष वेधले. तर अरिहंत पाणबुडीतून प्रक्षेपित केली जाणारी ‘के-१५’ आणि ‘के-४’ ही क्षेपणास्त्रे देखील चीनच्या शहरांचा वेध घेऊ शकतात, असा इशारा या जर्नलमधून देण्यात आला आहे. असे असले तरी, भारताने अण्वस्त्रांबाबत स्वीकारलेली ‘नो फर्स्ट युज’ भूमिका कायम असल्याचे या जर्नलने अधोरेखित केले.

leave a reply