‘रफायल’ विमाने ‘हॅमर’ क्षेपणास्त्रांनी सज्ज होणार

नवी दिल्ली – पुढील आठवड्यात फ्रान्स सहा ‘रफायल’ विमाने भारताकडे सुपूर्द करणारा आहे. या लढाऊ विमानांची तैनाती लगेचच चीन सीमेवर करण्याची तयारी वायुसेनेने केल्याच्या बातम्या येत असताना या विमानांची मारक क्षमता वाढविण्यासाठी फ्रान्सकडून ‘हॅमर’ क्षेपणास्त्रांची खरेदी करण्यात येत असल्याची बातमी आली आहे. तसेच वायुसेनेच्या मागणीनंतर फ्रान्सनेही ‘रफायल’ विमाने ‘हॅमर’ क्षेपणास्त्रांनी जलदगतीने सज्ज करण्याची तयारी दर्शविली आहे.

Rafayalचीनबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सरंक्षणदलांकडून मोठ्या प्रमाणावर शास्त्र आणि दारुगोळा खरेदी केला जात आहे. वायुसेनेही चीन सीमेवरील आपली सज्जता वाढविली आहे. फ्रान्सकडून ‘रफायल’ विमाने मिळाल्यावर वायुसेनेच्या क्षमतेत प्रचंड वाढ होणार असून ही विमाने लगेचच चीन सीमेवर तैनात करण्यात येतील अशा बातम्या आल्या होत्या. वायुसेनेनेच्या कमांडर कॉन्फरन्समध्ये या तैनातीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

‘रफायल’ विमाने घातक अशा ‘हॅमर’ क्षेपणास्त्रांनी सज्ज असावीत यासाठी वायुसेकडून या क्षेपणास्त्रांची खरेदी करण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात संरक्षण मंत्रालयाने तीनही संरक्षणदलांच्या आर्थिक अधिकारात वाढ केली होती. यानुसार ३०० कोटी रुपयांचे संरक्षण साहित्य संरक्षणदल आपल्या अधिकारात खरेदी करू शकतात. यासाठी सरकारच्या मंजुरीची गरज भासणार नाही. आपत्कालीन परिस्थितीत खरेदी प्रक्रियेतील वेळ वाचावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. याच अधिकाराचा वापर करून वायुसेना ‘रफायल’साठी ‘हॅमर’ क्षेपणास्त्रे खरेदी करणार असल्याचे सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. या संदर्भांत प्रक्रिया सुरु झाल्याची माहितीही या अधिकाऱ्याच्या हवाल्याने उघड झाली आहे.

Rafayal६० ते ७० किलोमीटर मारक क्षमता असेलेली मध्यमपल्ल्याची हवेतून जमिनीवर मारा करणारी ही क्षेपणास्त्रे लडाखसारख्या पर्वतीय भागांमध्ये उपयोगी ठरू शकतात, हे लक्षात घेऊन ‘रफायल’ विमाने ‘हॅमर’ने सज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फ्रान्सनेही मागणी नोंदविल्यावर कमी वेळेत या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे. वायुसेनेने अद्याप याबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाही. मात्र नुकतेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी वायुसेनेला कॊणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहा, असे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर हे वृत्त महत्वाचे ठरते.

leave a reply