जम्मू-काश्मीरच्या राजौरीत मोठा शस्त्रसाठा जप्त

श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचा छुपा तळ उद्वस्त करण्यात आला. येथून मोठ्या प्रमाणात शस्त्र व स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला असून यामध्ये चिनी बनावटीचे पिस्तुलही आहे.

Jammu-Kashmirराजौरी जिल्ह्यातील मनायल भागातील जंगलात दहशतवाद्यांच्या ठिकाणाची माहिती सुरक्षादलाला मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. राजौरी पोलिस, विशेष ऑपरेशन्स ग्रुप आणि लष्कराच्या ३८राष्ट्रीय रायफल्सच्या टीमने बुधवारी पहाटे येथील जंगलात दहशतवाद्यांचे हे ठिकाण शोधून काढले. या ठिकाणावरून पीका रायफल, एक चिनी पिस्तूल, देशी बनावटीचे पिस्तूल, एके-४७ चे मॅगेझीन, पिस्तूलचे चार राउंड, १६८ पीका रायफलचे राउंड , दोन अंडर बॅरल ग्रेनेड लॉंचरसह एक दुर्बीण, एक अँटीना, एक टेप रेकॉर्डर असे साहित्य जप्त केले.

हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्यानंतर या संपूर्ण परिसरात व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. पीका रायफल ही रशियन रायफल आहे. या रायफलची अग्निशामक क्षमता दीड किलोमीटर आहे. यामध्ये 250 राउंडचा बेल्ट लावता येतो. या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने दहशतवादी मोठया घातपाताच्या तयारीत होते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जून महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. यावेळी ‘एके ५६ रायफल’, २७ राउंड व एके मॅगझिन, एक यूबीजीएल, एक ९ एमएम पिस्तूल आणि सहा राऊंडच्या मॅगझिनसह एक पिस्तूल जप्त करण्यात आले होते.

leave a reply