राजवटविरोधी आंदोलन दडपण्यासाठी इराणने विद्यापीठांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात केले

तेहरान/दुबई – सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात भडकलेले आंदोलन दडपणे इराणसाठी आव्हान ठरत आहे. या आंदोलनाचे स्त्रोत ठरणाऱ्या वेगवेगळ्या शहरांमधील विद्यापीठांमध्ये इराणने सुरक्षा रक्षकांना तैनात केले. त्याचबरोबर रस्त्यावर निदर्शने करणाऱ्या शेकडो जणांना अटक केली आहे. यामध्ये इंटरनेटद्वारे या आंदोलनाला जगभर पोहोचविणाऱ्या तरुणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांमधील आंदोलनात बळी गेलेल्या तरुणींचे आईवडील माध्यमांसमोर येऊन सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या अमानवी कारवाईची माहिती देत आहेत.

Iran protestयाआधी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यांवरुन इराणमध्ये सरकारविरोधात निदर्शने भडकली होती. राजधानी तेहरानमधील व्यापारी वर्ग यामध्ये सहभागी झाला होता. पण गेल्या तीन आठवड्यांपासून इराणमध्ये तीव्र झालेली ही निदर्शने निराळेच संकेत देणारी असल्याचा दावा इराणविषयक विश्लेषक करीत आहेत. याआधी निदर्शकांनी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या जवानांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात समोर आल्या नव्हत्या.

पण सध्या सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स, बसिज मिलिशिया तसेच इराणी पोलिसांवर जीवघेणे हल्ले झाल्याचे विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. तर इराणच्या राजवटीचे अधिकारी व प्रचारकांना शाळा, कॉलेजमधील विद्यार्थीनींनी पाठलाग करून पळवून लावल्याच्या घटना घडल्या आहेत. या विद्यार्थीनींनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात घोषणा देऊन बुरखा काढून फेकण्याचे आणि केस कापण्याचे प्रकारही घडले आहेत, याकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

याआधीच्या आंदोलनाचे नेतृत्व इराणमधील विरोधी पक्षातील नेत्यांकडून केले जात होते. पण आत्ताचे आंदोलन नेतृत्वहीन असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत. इराणमधील मध्यम तसेच उच्चवर्गीयांमधून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे इराणमधील प्रत्येक गटाकडून या हिजाबविरोधी आंदोलनाला मिळालेले समर्थन इराणच्या राजवटीसमोरील आव्हान ठरत आहे. याआधी इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी हिजाबविरोधी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई केली होती.

पण आत्ता या आंदोलनाचे केंद्र इराणच्या वेगवेगळ्या शहरांमधील विद्यापीठे ठरत आहेत. येथील तरुण-तरुणी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे इराणने या विद्यापीठांवर कारवाई सुरू केली आहे. इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी वेगवेगळ्या शहरांमधील विद्यापीठांचा ताबा घेतल्याचा आरोप मानवाधिकार संघटना करीत आहेत. तर या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची इराणच्या सुरक्षा यंत्रणा धरपकड करीत आहेत. यामध्ये सदर आंदोलन जगभरात पोहोचविणाऱ्या सोशल मीडियावरील ब्लॉगर्सचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तर इराणच्या राजवटीने 35 पत्रकार आणि फोटोग्राफ्सर्सना देखील ताब्यात घेतले आहे. त्यामुळे इराणच्या माध्यमांमधील एक गट देखील राजवटीवर नाराज झाल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, हे आंदोलन शांत करण्यासाठी इराणने सुरक्षा जवानांच्या कारवाईत बळी गेलेल्या मुलींच्या कुटुंबियांवर दबाव टाकल्याचे उघड झाले आहे. 16 वर्षी निका शाकारमी हिचा इमारतीच्या गच्चीवरुन पडून मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी दिली होती. तसेच निकाच्या कुटुंबियांकडून देखील सुरक्षा यंत्रणांनी हेच वदवून घेतले होते. पण निकाच्या आईने आंदोलनात सहभागी होऊन इराणच्या सुरक्षा यंत्रणेने आपल्यावर टाकलेल्या दबावाची माहिती उघड केली आहे. त्यामुळे इराणच्या राजवटीसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

leave a reply