भारताकडून १०८ देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवरील उपचारासाठी आत्तापर्यंत सर्वात प्रभावी ठरलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाला जगभरात प्रचंड मागणी आहे. याची सर्वाधिक प्रमाणात निर्मिती करणाऱ्या भारताने याचा पुरवठा आपल्याला करावा , यासाठी जगभरातील देश मोठ्या आशेने भारताकडे पाहत आहेत. यामध्ये अमेरिकेसारख्या सुपरपॉवर पासून ते आफ्रिकेतील अत्यंत मागासलेल्या देशांचाही समावेश आहे. भारतानेही आपल्यावरची ही जबाबदारी ओळखून सुमारे एकशे आठ देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा सुरू केला आहे. यासाठी जगभरातील देशांकडून भारताची मुक्तकंठाने प्रशंसा केली जात आहे.

जगभरात कोरोनाव्हायरसने दीड लाख जणांचा बळी गेला आहे. तर जगभरात या साथीची लागण झालेल्यांची संख्या २० लाखांच्याही पुढे गेली असून त्यांचावर उपचार सुरु आहेत. अद्याप या साथीवर लस मिळालेली नाही. सध्या तरी या साथीवर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हेच प्रभावी औषध ठरत आहे. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची निर्मिती करणाऱ्या भारताकडे जगातल्या प्रमुख देशांनी या औषधाची मागणी केली आहे.

भारत सुमारे १०८ देशांना आठ कोटी ५० लाख इतक्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन टॅबलेटसचा पुरवठा करीत आहे. त्याच्या जोडीला पॅरासिटामॉलचाही पुरवठा केला जात आहे. यातल्या काही देशांपर्यंत हे सहाय्य पोहोचले आहे. यात महासत्ता अमेरिकेचाही समावेश आहे. सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावरून भारताला आक्रमक इशारा दिला होता.

भारतातून प्रतिक्रिया आल्यानंतर ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेतली. त्यानंतर भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले. तर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सेनारो यांनी भारताने दिलेले हे औषध म्हणजे ब्राझीलसाठी संजीवनी असल्याचे म्हटले होते. हनुमंताने दिव्य संजीवनी आणून श्रीरामांचे बंधू लक्ष्मण यांचे प्राण वाचविले होते. तसेच भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करून ब्राझीलच्या नागरिकांचे प्राण वाचविले आहे, असे बोल्सेनारो म्हणाले होते. अगदी हनुमान पौर्णिमेच्या दिवशीच ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी याचा उल्लेख केला होता.

दरम्यान, भारत इतर देशांना जरी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करीत असला तरी देशातंर्गत मागणीला पर्याप्त ठरेल, इतका साठा असल्याची ग्वाही केंद्र सरकारकडून दिली जात आहे. जगभरातून येत असणाऱ्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर औषधांची निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्यानी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन व पॅरासिटामॉलचे उत्पादन वाढविले आहे. जग कोरोनाव्हायरसच्या भयंकर कचाट्यात सापडले असताना भारताकडून केल्या जाणाऱ्या या औषधांचा पुरवठा अतिशय उपकारक ठरत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा प्रभाव दिवसागणिक वाढत चालला आहे.

leave a reply