सीमावादाला भारतच जबाबदार असल्याचा चीनचा आरोप

सीमावादालाबीजिंग – चीनने भारताबरोबरील सीमा नियोजनासंदर्भात झालेल्या करारांचे उल्लंघन केले आणि यामुळेच दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले, असा आरोप भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला होता. त्यावर चीनची प्रतिक्रिया आली आहे. चीनने नाही तर भारतानेच सीमेसंदर्भातील कराराचे उल्लंघन केले, असा ठपका चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने ठेवला आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर लॅटिन अमेरिकन देशांच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या ब्राझिल भेटीत जयशंकर यांनी चीनबरोबरील भारताच्या ताणलेल्या संबंधांना चीनच्या सीमेवरील कुरापतखोर कारवाया जबाबदार असल्याचा आरोप केला. दोन्ही देशांमध्ये एलएसीवर सैन्य तैनात करायचे नाही, असे करार 1993 व 1996 सालीच झाले होते. चीनने त्याचे उल्लंघन केले. लडाखच्या गलवान खोऱ्यात काय झाले ते सर्वांना ठाऊक आहे. ही समस्या अजूनही सुटलेली नाही आणि त्याचा परिणाम भारत-चीन संबंधांवर झालेला आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ब्राझिलच्या साओ पावलो येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध असणे अत्यावश्यक आहेच. मात्र हे संबंध एकतर्फी असू शकत नाही, यासाठी दोन्ही देशांनी परस्परांचा आदर करणे अनिवार्य ठरते, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली होती. रविवारी जयशंकर यांनी केलेल्या या विधानांचे पडसाद चीनकडून उमटले आहेत. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने भारतामुळेच सीमावाद पेटल्याचा आरोप केला. गेल्या 20 वर्षांपासून भारत चीनलगतच्या आपल्या सीमेजवळ लष्करी क्षमता वाढवित आहे. त्यामुळे 1993 सालच्या कराराचे चीन नाही, तर भारतच उल्लंघन करीत असल्याचा ठपका ग्लोबल टाईम्सने ठेवलेला आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर एलएसीजवळील आपल्या देशाच्या या कारवायांकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे ते सातत्याने अशा प्रकारची विधाने करीत राहिले, तर ती बाब दोन्ही देशांच्या संबंधांसाठी उपकारक ठरणार नाही, असा शेरा देखील ग्लोबल टाईम्समधील लेखात मारण्यात आलेला आहे. दरम्यान, असियानच्या बैठकीत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारत व चीन एकत्र आल्याखेरीज हे शतक आशियाचे शतक म्हणून ओळखले जाऊ शकणार नाही, असे विधान केले होते. पण चीनच्या कारवायांमुळे हे अवघड बनल्याची जाणीव त्यांनी थायलंडच्या एका विद्यापीठातील आपल्या व्याख्यानात करून दिली होती. मात्र त्यांच्या निवडक विधानांचा दाखला देऊन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याचे स्वागत केले होते.

यामुळेच लॅटिन अमेरिकन देशांच्या दौऱ्यात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना पुन्हा एकदा चीनच्या चिथावणीखोर कारवायांमुळेच दोन्ही देशांचे संबंध विकोपाला जात असल्याची बाब लक्षात आणून द्यावी लागली. त्यानंतर आपल्या सरकारी वर्तमानपत्राद्वारे चीनला खुलासे द्यावे लागत असल्याचे दिसत आहे. सीमावाद कितीही चिघळला आणि दोन्ही देशांचे हजारो सैनिक सीमेवर एकमेकांसमोर खडे ठाकले, तरी हरकत नाही. त्याचा द्विपक्षीय सहकार्यावर परिणाम होता कामा नये, अशी चीनची फाजिल अपेक्षा आहे. वेगळ्या शब्दात चीनला भारताबरोबरील व्यापारी सहकार्य कायम ठेवून सीमेवर भारताच्या सुरक्षेला आव्हान देण्याच्या योजनेवर काम करायचे आहे. मात्र गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताने स्वीकारलेल्या कठोर भूमिकेमुळे चीनचा नाईलाज झाला असून चीनची ही योजना बारगळल्याचे दिसत आहे. मात्र या अपयशाचे खापर भारतावरच फोडण्याचा डाव चीनने आखला आहे.

leave a reply