गाझापट्टीत कारवाई सुरू असताना इस्रायली लष्कराने ‘तिसऱ्या देशात’ हल्ले चढविले

- इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांची लक्षवेधी घोषणा

‘तिसऱ्या देशात’जेरूसलेम – गाझापट्टीतील दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना, इस्रायली लष्कराने ‘तिसऱ्या देशात’ हल्ले चढविल्याची घोषणा इस्रायलचे संरक्षणदल प्रमुख अविव कोशावी यांनी केली. या तिसऱ्या देशाचे नाव इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी उघड केलेले नाही. पण त्यांच्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाझापट्टीतील ‘पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद-पीआयजे’ या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर शेकडो रॉकेट्सचा मारा केला होता. प्रत्युत्तरादाखल इस्रायली लष्कराने ‘ब्रेकिंग डॉन’ या लष्करी मोहिमेअंतर्गत गाझावर हवाई हल्ले चढविले. 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या संघर्षानंतर इजिप्तच्या मध्यस्थीने इस्रायल आणि पीआयजेमध्ये संघर्षबंदी लागू करण्यात आली.

इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी ‘फेडरेशन ऑफ लोकल अथॉरिटीज’च्या बैठकीत बोलताना 5 ते 8 ऑगस्ट दरम्यानच्या काळातील गाझातील कारवाईबाबत माहिती दिली. ‘इस्रायली लष्कराने गाझातील पीआयजेचा दहशतवादी तयसीर जबारी याच्यावर अचूक हल्ला चढविला. यात तो ठार झाला. तसेच यावेळी इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी वेस्ट बँकमध्ये कारवाई करून काही जणांना अटक केली. तर आपल्या सीमेच्या सुरक्षेसाठी इस्रायली लष्कराने तिसऱ्या देशातही हल्ले चढविले’, असे संरक्षणदलप्रमुख कोशावी म्हणाले. त्याचबरोबर इस्रायली लष्कराने 360 डिग्रीमध्ये अर्थात सर्व दिशांनी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज रहावे, अशी लक्षवेधी सूचना लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी केली.

‘तिसऱ्या देशात’हा तिसरा देश कोणता, या हल्ल्यात त्या देशातील कुणाला लक्ष्य केले, याचे तपशील संरक्षणदलप्रमुख किंवा इस्रायली लष्कराने उघड केलेले नाहीत. पण संरक्षणदलप्रमुखांच्या या माहितीनंतर इस्रायली तसेच आखातातील माध्यमांनी त्यावर वेगवेगळे दावे ठोकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये इस्रायली लष्कराने सिरियातील इराण व हिजबुल्लाहशी संलग्न असलेल्या ठिकाणांवर शेकडो हल्ले चढविलेले आहेत. पण इतक्या वर्षांमध्ये इस्रायलने फक्त एकदाच या कारवाईची कबुली माध्यमांसमोर दिली होती. अन्यथा सिरिया, इराणने कितीही आरोप केले तरीही इस्रायलने सिरियातील कारवाईबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळलेले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी येमेनमध्ये संशयास्पद हल्ले झाल्याची बातमी अरबी वृत्तसंस्थांमध्ये प्रसिद्ध झाली होती, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत. 7 ऑगस्ट रोजी येमेनची राजधानी सनाजवळील शस्त्रास्त्रांच्या कोठारात आणि कारखान्यात मोठा स्फोट झाला होता. स्फोटावेळी या ठिकाणी हौथी बंडखोरांबरोबर इराणचे अधिकारी व हिजबुल्लाहचे दहशतवादी ठार झाल्याचे या वृत्तसंस्थांनी म्हटले होते. त्यामुळे इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख दावा करीत असलेला तो तिसरा देश म्हणजे ‘येमेन’ असण्याची शक्यता इस्रायली माध्यमांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीच हौथी बंडखोरांनी इराणची बाजू उचलून धरून इस्रायलवर क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. त्यानंतर इस्रायली लष्कराला देशाच्या दक्षिणेकडील एलियट शहरात हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करावी लागली. या पार्श्वभूमीवर, इस्रायली लष्कराने येमेनमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनेविरोधात ही कारवाई केल्याची शक्यता नाकारता येत नाही.

leave a reply