भारत-रशियाची मैत्री काळाच्या कसोटीवर टिकून राहिली

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – भारत आणि रशियाची मैत्री काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाबरोबरील संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘ईर्स्टन इकॉनॉमिक फोरम-ईईएम’च्या कार्यक्रमाला व्हर्च्युअल माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन उपस्थित होते. रशियाच्या अतिपूर्वेकडील भागांमधील इंधनक्षेत्रासाठी भारत हा विश्‍वासार्ह भागीदार देश असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी स्पष्ट केले. तसेच भारत व रशियाचे सहकार्य ऊर्जेच्या जागतिक बाजारपेठेला स्थैर्य प्रदान करणारे असेल, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

2019 साली पंतप्रधान मोदी यांनी रशियाच्या अतिपूर्वेकडील व्लादिवोस्तोकला भेट दिली होती. या क्षेत्रातील इंधनाच्या उत्खनानासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ॲक्ट फार ईस्ट धोरण तयार केले होते. त्याची प्रशंसा भारताच्या पंतप्रधानांनी केली. या क्षेत्रात रशियाबरोबर सहकार्य करण्यासाठी भारताकडे गुणवत्ता असलेले व निष्ठेने काम करणारे कुशल मनुष्यबळ आहे. भारतीयांकडे असलेले हे कौशल्य रशियाच्या अतिपूर्वेेकडील इंधनसंपन्न भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान देईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली. ऊर्जेच्या क्षेत्रातील भारत व रशियाचे हे सहकार्य आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला स्थैर्य देणारे ठरेल, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

अंतराळ क्षेत्रापासून पासून ते नॉर्दन सी रूटस्‌ अर्थात सागरी वाहतुकीच्या विकासासाठी भारत व रशिया एकमेकांना सहकार्य करीत आहेत. व्यापारी जहाजांच्या उभारणीसाठी भारताच्या माझगाव डॉक व रशियाच्या झ्वेदा कंपनीमध्ये झालेल्या भागीदारीचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. तसेच कोरोनाची साथ आल्यानंतर भारत व रशियाने एकमेकांना केलेले सहाय्य फार मोठे होते. विशेषतः लसींबाबत दोन्ही देशांचे सहकार्य लक्षवेधी ठरले, याचीही आठवण पंतप्रधान मोदी यांनी करून दिली. रशियाचे व्लादिवोस्तोक हे युरेशिया व पॅसिफिकचा संगम घडविणारे स्थान असल्याचे सांगून याला फार मोठे महत्त्व असल्याचा दावा भारताच्या पंतप्रधानांनी केला.

दरम्यान, चीनकडून भारताच्या सुरक्षेला व हितसंबंधांना मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर, भारताचे अमेरिकेबरोबरील सहकार्य वाढत चालले आहे. त्याचा परिणाम भारताच्या रशियाबरोबरील सहकार्यावर होऊ लागल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. भारताने चीनच्या विरोधात अमेरिका उभारीत असलेल्या क्वाडच्या आघाडीत सहभागी होऊ नये, अशी मागणी रशियाने केली होती. पण ही बाब भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण चीनच्या अतिमहत्त्वाकांक्षेपासून भारताला धोका संभवतो, याची जाणीव भारत रशियाला करून देत आहे.

leave a reply