पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबानचे जोरदार हल्ले सुरू

पेशावर/संयुक्त राष्ट्र – शुक्रवारी अफगाणिस्तानच्या सरकार स्थापनेची घोषणा करण्यात येईल, असे तालिबानने जाहीर केले होते. पण ही घोषणा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. याचे कारण तालिबानने दिलेले नाही. पंजशीर खोऱ्यातून नॉर्दन अलायन्सकडून मिळत असलेले आव्हान हे त्याचे कारण असावे, अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबानने हल्ला चढविला होता, पण यात तालिबानला अपयश आल्याचा दावा नॉर्दन अलायन्सकडून केला जात आहे. इतकेच नाही तर नॉर्दन अलायन्सने तालिबानच्या विरोधात सुरू केलेला संघर्ष म्हणजे आशेचा किरण असल्याचा दावा अमरुल्ला सालेह यांनी केला आहे.

तालिबानची सरकार स्थापना पुढे ढकलली असली तरी अफगाणिस्तानातील प्रांतांचे गव्हर्नर तालिबानने दोन दिवसांपूर्वीच घोषित केले होते. अजूनही ताब्यात नसलेल्या पंजशीर प्रांताची जबाबदारी तालिबानने अमिर खान मुत्ताकी याच्याकडे सोपविली होती. दोहा येथील वाटाघाटीमध्ये महत्त्वाची भूमिका स्वीकारणाऱ्या मुत्ताकीने नेतृत्व मिळाल्यानंतर पंजशीरवर जोरदार हल्ले चढविण्याचे आदेश दिले. गेल्या दोन दिवसांपासून तालिबानचे दहशतवादी अमेरिकेच्या हमवी लष्करी वाहनातून शेकडोंच्या संख्येने पंजशीरच्या खोऱ्यात दाखल होत आहेत. पंजशीरचा ताबा घेऊन अफगाणिस्तानात विलिन करण्यासाठी मुत्ताकीने अमेरिकेच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचा दावा केला जातो.

या लष्करी कारवाईबरोबर तालिबान व तालिबान समर्थकांनी सोशल मीडिया तसेच माध्यमांमधून अपप्रचारही सुरू केला आहे. अमरुल्ला सालेह आणि अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या नॉर्दन अलायन्सचे 34 जवान तालिबानने मारल्याचा दावा या माध्यमांनी केला होता. तसेच 11 सुरक्षा चौक्या ताब्यात घेतल्याचे प्रसिद्ध केले होते. पाकिस्तानातील सोशल मीडियाचे अकाऊंट्स या अपप्रचाराला हवा देत असल्याचे समोर आले आहे.

पण नॉर्दन अलायन्सने तालिबान व त्यांच्या पाकिस्तानी समर्थकांचे हे दावे खोडून काढले. उलट आपल्या कारवाईत तालिबानला मोठी जीवितहानी सोसावी लागली व काही दहशतवादी पळून गेल्याचे नॉर्दन अलायन्सने जाहीर केले. यासंबंधीचे फोटो व व्हिडिओही नॉर्दन अलायन्सने प्रसिद्ध केले. यानंतर पंजशीर खोऱ्यातील टेलिफोन व इंटरनेट सेवा काही काळासाठी खंडीत केल्याचे आरोप झाले होते.

तर शुक्रवारी तालिबानसमर्थक माध्यमांनी पंजशीरच्या संघर्षात दहशतवादी संघटनेला यश मिळाल्याचे नवे दावे केले. तालिबानच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी सालेह आणि मसूद यांनी ताजिकिस्तानला पलायन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याची पुष्टी होऊ शकलेली नाही. पण पंजशीरमधील संघर्षात नॉर्दन अलायन्स पराभूत झाल्यास तालिबानचे दहशतवादी या भागात युद्धगुन्हे करून अमानुष कत्तली घडवतील, अशी चिंता व्यक्त केली जाते.

leave a reply